अमेरिकेची लेक होतेय जळगावकरांची सून !

रईस शेख
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

सोशल मीडिया साइटवर त्याची ऍना रेनवॉल अमेरिकेतील तरुणीशी ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

जळगाव : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य भारत दौऱ्यावर टीव्ही चॅनेल्सने रान उठवले असताना जळगावच्या सॉफ्टवेअर अभियंता तरुण अमेरिकेचा जावई, तर अमेरिकेची लेक जिल्ह्यातला सामान्य शेतकरी कुटुंबाची सून होतेय.. सोशल मीडियावरील त्यांच्यातील ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन हे बहरलेले प्रेम आता नात्यांच्या बंधनात बदलतेय.. 

जळगावातील योगेश विठ्ठल माळी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत असताना सोशल मीडिया साइटवर त्याची ऍना रेनवॉल अमेरिकेतील तरुणीशी ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ऍना त्याच्या कुटुंबीयांसह जळगावला आली असून भारतीय संस्कृती प्रमाणे उद्या (ता. 22) हळद व गोरज मुहूर्तावर शुभमंगल होत आहे. 

नक्की वाचा :आई उभी राहली...अन्‌ चिमुकला खिडकीतून झाला गायब ! 
 

योगेश अमेरिकेत नोकरीला.. 
योगेश विठ्ठल माळी या तरुणाने प्राथमिक शिक्षण विद्यानिकेतन शाळेतून, महाविद्यालयीन शिक्षण एम.जे. कॉलेज येथून तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्याच्या शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. योगेश "एमएस इन कॉम्प्युटर'चे शिक्षण पूर्ण केल्यावर अमेरिकेत सॉफ्ट इन्फोनेट फार्मा या कंपनीत नोकरीला लागला. जॉब करत असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत ऍना रेनवालशी ओळखी होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. 

आर्वजून पहा : गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली ! 
 

भावी सुनेशी व्हीडीओकॉल 
योगेश माळी व ऍना रेनवॉल या दोघांचा लग्नाचा निर्णय झाल्यावर योगेशने सर्वांत प्रथम घरी आईला कळवले. मूळ रावेर तालुक्‍यातील सामान्य शेतकरी कुटुंबीय असल्याने त्यांचा याच्यावर विश्‍वासच बसला नाही. नंतर, त्याने फोटो दाखवून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सासू- सुनेची भेट घडवून आणली. उभयतांच्या कुटुंबीयांनी होकार दिल्यावर योगेश ऍनासोबत नुकताच जळगावी परतला असून त्यांच्या स्वागतासाठी हरेश्‍वर नगरातील पंचारती अपार्टमेंट सज्ज होतेय. आई सुभद्रा वयस्क आणि वडील आजारी असल्याने विवाह सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी पोलिस कर्मचारी बाळासाहेब जाधव यांनी स्वीकारलीय. लहान भाऊ प्रशांत याच्या जोडीला जाधव लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. 

भारतीय संस्कृतीचे कुतूहल 
ऍना लग्नासाठी जळगावला आल्या असून पहिल्यांदाच सासू सुभद्रा, सासरे विठ्ठल माळी, दीर प्रशांत, नणंद कांचन जगदीश महाजन अशा कुटुंबीयांची गाठ भेट घडली. मराठी मुलींप्रमाणे ऍनाने भारतीय परंपरेनुसार राहणीमानात बदल केला असून, चुडीदार दुपट्टा, कपाळावर टिकली लावून दोन दिवसांपासून कुटुंबीयांत वावरत आहे. अपार्टमेंटमधील रहिवशांतर्फे आलेल्या आमंत्रणाला वधू-वर जोडीने हजर राहून आशीर्वाद घेत आहेत. शनिवारी (ता. 22) भारतीय संस्कृती प्रमाणे हळदीचा कार्यक्रम होत असून गोरज मुहूर्तावर दोघांचे शुभमंगल होतेय.. या भारतीय रीतिरिवाज आणि परंपरेचे कुतूहल आणि आदर असल्याचे ऍना सांगते. 
 

नक्की वाचा : घरी पोहचणार... तेवढ्यातच होत्याचे नव्हते झाले ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Lake of the America Jalgaonkar Daughter-in-law