"लॉकडाउन' विद्यार्थ्यांना फायद्याचेच; गुणवत्तेवर होणार परिणाम? 

"लॉकडाउन' विद्यार्थ्यांना फायद्याचेच; गुणवत्तेवर होणार परिणाम? 

जळगाव:  "कोरोना'ने सर्वत्र थैमान माजविल्याने 24 मार्चपासून असलेला "लॉकडाउन' आता 3 मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर "कोरोना'चा धोका लक्षात घेता देशभरातील सर्वच शाळा बंद ठेवण्यात आलेल्या असून, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश निश्‍चित करण्यात आला आहे; तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार असल्याची चिंता शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर कोणताही परिणाम होणार नसून, याउलट त्यांना पूर्णवेळ पालकांसमवेत घरातच काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. पालकांना मुलांची विविध कौशल्येही जाणून घेण्यास मदत होत आहे. त्यामुळे याचा फायदाही होणार असल्याचा आनंद शिक्षणतज्ज्ञांना आहे. 

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांची चिंता 
नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचा टर्निग पॉइंट असल्याने त्यांच्या या काळात विविध क्‍लासेसच्या माध्यमातून किंवा शालेय तासिकेत शिक्षकांकडून शिकविण्यात येत असलेल्या अभ्यासापासून विद्यार्थी जवळपास तीन महिन्यांपर्यंत वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम निश्‍चितच होणार असल्याची चिंता शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 

ऑनलाइन अभ्यासक्रम चांगला 
"लॉकडाउन'च्या काळात सर्वच विद्यालये आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या होमवर्क देत आहेत. परंतु याचा पाहिजे तसा परिणाम विद्यार्थ्यांमध्ये जाणवणार नाही. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासात खंड पडल्यामुळे ते अभ्यासापासून दूर आहेत. शालेय वातावरणात शिक्षक व विद्यार्थ्यांचा समोरासमोर संवाद होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शंकांचे समाधान जागेवरच केले जाते. हे कुठेतरी थांबले असल्याचा परीणाम विद्यार्थी जीवनावर होणार आहे. ऑनलाइन अभ्यास जरी चांगला असला तरी सर्वच पालकांजवळ याची सोय उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. 

विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास 
मुलांना "लॉकडाउन'च्या काळात बाहेर पडताच येत नसल्याने दिवसभर मुलांना पालकांसमवेत वेळ घालविण्याची संधी मिळाली असून, आई-वडिलांच्या हाताखाली अभ्यास करण्याची युट्युब व ऑनलाइनच्या मदतीने अभ्यास करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. 


नियोजनानुसार अभ्यास हवा 
पुढील शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अकरावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे नियोजन करावे लागणार असून, इतर शैक्षणिक उपक्रमांना फाटा देऊन अभ्यासासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. दहावीबाबत विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागणार असून, "लॉकडाउन'मुळे विद्यालयांमधील सुटीचे वर्ग आणि खासगी शिकवण्याही बंद असल्याने सुटीच्या काळात बहुतेक अभ्यासक्रम याद्वारे पूर्ण केला जातो. ऑनलाइनमध्ये मर्यादा असल्याने शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे. 
- चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक, मू. जे. महाविद्यालय, जळगाव 

मुले, पालकांना "लॉकडाउन' वरदान 
"लॉकडाउन'मुळे मुलांना पालकांसमवेत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घेण्याची सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नसल्याने पालकांनी चिंता करू नये. सुटीच्या काळात पाल्यांना घडविण्याचा एक अनमोल क्षणच न मागता मिळाला असल्याने पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्याची सुवर्णसंधीच चालून आली आहे. त्यामुळे "लॉकडाउन' हे मुले व पालकांसाठी वरदानच आहे. 
- महेश गोरडे, संचालक, कुतूहल फाउंडेशन, जळगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com