सिमेंट, स्टील उत्पादकांचा काळाबाजार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

सिमेंट व स्टीलच्या दरात जवळपास 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून "लॉकडाउन'मध्ये मागणी घटलेली असताना ही वाढ म्हणजे काळा बाजार आहे. या दरवाढीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रच ठप्प होणार असून कोट्यवधींचा रोजगार बुडून सरकारचे उत्पन्नही घटेल व गंभीर स्थिती निर्माण होईल. केंद्र सरकारने या विषयात हस्तक्षेप करून दर पूर्ववत करावे. 
- अनीश शाह,  सहसचिव, क्रेडाई, महाराष्ट्र 

जळगाव : चार वर्षांपासून नोटबंदी, जीएसटी, रेराचा मार सहन करणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्राला या काळात सिमेंट व स्टीलच्या दरात तब्बल 40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याने या क्षेत्राचे कंबरडेच मोडले आहे. सिमेंट व स्टील उत्पादक कंपन्यांनी ऐन "लॉकडाउन'च्या काळात हा काळाबाजार केल्याची भावना बांधकाम क्षेत्रातून व्यक्त होत आहे. यातून बांधकामाचा खर्च वाढून घर सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जाणार आहे. 

आवर्जून वाचा - मुंबई ते धुळे...आधुनिक श्रावणबाळाने चक्क वृध्द पित्याला नेले खांद्यावर 

भारतात कृषिक्षेत्रानंतरचे सर्वाधिक मोठे व अर्थव्यवस्थेस हातभार लावणारे क्षेत्र म्हणून रिअल इस्टेट क्षेत्राची ओळख आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशात 24 मार्चपासून "लॉकडाउन' आहे. दीड महिन्यापासून अर्थचक्र ठप्प असून बांधकाम व पायाभूत सुविधांचे क्षेत्रही त्यातून सुटलेले नाही. उलटपक्षी गेल्या चार वर्षांपासून "रिअल इस्टेट'च्या या क्षेत्राला सातत्याने विविध घटकांचा मार बसला आहे. नोव्हेंबर 2016मध्ये नोटबंदी, नंतर जीएसटी व "रेरा'चा मार या क्षेत्राला बसला. 

आता सिमेंट, स्टीलचा काळाबाजार 
"लॉकडाउन'च्या काळात सिमेंट, स्टीलची मागणी प्रचंड घटलेली असताना अचानक सिमेंट व स्टीलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत स्टील व सिमेंटचे दर चक्क 40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. सिमेंटचा दर एका गोणीमागे तब्बल 100 ते 125 तर स्टीलच्या दरात टनामागे दोन ते अडीच हजार रुपये वाढ झाली आहे. या दरवाढीमागे स्टील, सिमेंट उत्पादकांनी योजून काळा बाजार केल्याचे मानले जात आहे. 

घरांच्या किमती वाढणार 
"लॉकडाउन'मुळे बांधकामांच्या साइटस्‌ बंद आहेत. पायाभूत सुविधांमध्ये सरकारने महामार्गाची कामे सुरु करण्यासंबंधी निर्देश दिले. मात्र, मजूर व कामगारांअभावी बहुतांश कामे बंद आहेत, तर काही कामे कमी क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यातच सिमेंट, स्टीलच्या दरवाढीने बांधकाम महागणार असून घरे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जाणार आहेत. 

क्रेडाईचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन 
स्टील व सिमेंटच्या या प्रचंड दरवाढीविरोधात क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या देशव्यापी संघटनेच्या वतीने केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकासमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. अशाप्रकारे काळाबाजार करुन या दोन्ही प्रमुख घटकांचे दर वाढत असतील तर हे कोलमडलेले क्षेत्र आणखी अडचणीत येईल. कोट्यवधी कामगार आणखी बेरोजगार होतील. त्यामुळे यामागाचा काळा बाजार हुडकून काढत दर पूर्ववत करावे, अशी मागणी क्रेडाईने केली आहे. 

असे आहेत दर 
घटक---------- "लॉकडाउन'पूर्वी------- ---"लॉकडाउन'नंतर 
सिमेंट (प्रतिबॅग)--240 ते 250------------380 ते 390 
स्टील (प्रतिकिलो)-- 36 ते 38------------44 ते 46 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lockdown cement and steel high rate