महाविकास आघाडीचे सरकार जनतेचेच! : आमदार किशोर पाटील  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

विधानसभा निवडणूक निकालानंतर घडलेल्या राजकीय नाट्यामुळे तब्बल सव्वा महिना मुंबईत तळ ठोकून असलेले आमदार किशोर पाटील आता मतदारसंघात परतले आहेत. मतदारसंघातील दुष्काळी स्थितीसह विविध प्रश्‍न व समस्या जाणून घेण्यासाठी ते मतदारसंघाचा दौरा करण्यात गुंतलेले आहेत.

पाचोरा : राज्यात अनेक नाट्यमय राजकीय हादरे व घडामोडींनंतर थोड्या उशिरा का असेना; परंतु शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांच्या एकत्रीकरणातून सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार हेच खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने राज्यात महाविकासाचे व प्रत्येक व्यक्तीला न्यायाचे स्वप्न पूर्णत्वास येणार असल्याने हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल व सत्तेची पुन्हा संधी मिळविण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्नशील असलेल्या सत्तास्वार्थी विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फिरेल, असा विश्‍वास पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

क्‍लिक करा > अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळावं याला माझा विरोध नाही ः भुजबळ

विधानसभा निवडणूक निकालानंतर घडलेल्या राजकीय नाट्यामुळे तब्बल सव्वा महिना मुंबईत तळ ठोकून असलेले आमदार किशोर पाटील आता मतदारसंघात परतले आहेत. मतदारसंघातील दुष्काळी स्थितीसह विविध प्रश्‍न व समस्या जाणून घेण्यासाठी ते मतदारसंघाचा दौरा करण्यात गुंतलेले आहेत. मुंबईत सत्ता स्थापनेसंदर्भात झालेल्या घडामोडी व त्यातून आलेले अनुभव यासंदर्भात आमदार किशोर पाटील म्हणाले, की ज्या काही घटना घडल्या त्या पूर्णतः अनपेक्षित होत्या. असे काही घडेल हे स्वप्नातही पाहिले नव्हते. या घटनांमुळे राजकारणात काहीही होऊ शकते, याची अनुभूती आली. एकाच रात्री केंद्रातील कॅबिनेटची बैठक, राष्ट्रपती राजवट उठविणे, भल्या पहाटे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा राजभवनात शपथविधी पार पडणे या घटना मन सुन्न करणाऱ्या होत्या. "हसू आणि आसू' या दोन्हींची अनुभूती यामुळे आली. सेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसकडे स्पष्ट बहुमत असताना व आता आपलेच सरकार सत्तारूढ होईल हे चित्र सुस्पष्ट झालेले असताना अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणे हा प्रकार हमशाहीपुढे लोकशाही झुकविण्यासारखा होता. सत्तेची गुर्मी आणि उन्माद काय असू शकतो हे यातून कळाले. या प्रकारामुळे उलट शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्ष यांच्यातील मैत्री व आघाडी जास्त घट्ट होण्यास मदत झाली. मुंबईतील एका महिन्याच्या काळातील ते सर्व प्रकार वेदनादायी व दुःखदायी होते. आम्ही सतत जनतेत राहत आलो, जनतेशी नाळ तुटू दिली नाही. त्यामुळे इतके दिवस जनतेशिवाय राहणे हा प्रकार अत्यंत क्‍लेशदायक होता. जे गतकाळात ठरले होते तसे काही ठरलेलेच नाही, मुख्यमंत्री पदासंदर्भातला शब्द दिलेलाच नाही, ही भाजपची खोटारडी वृत्ती सेनेला खोटे ठरविण्यासारखी असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाले व राज्याच्या जनतेपुढे खोटारडा म्हणून मी, माझे आमदार व माझा पक्ष जाणे योग्य नाही या निर्धाराने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय पक्का केला. किमान समान कार्यक्रमाच्या आधारे राज्याच्या परिपूर्ण विकासाचे व पुनर्वैभवाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सर्वार्थाने प्रयत्न केले व अखेर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे. तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. सर्व प्रकारचा विकास साध्य करण्याचे व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देऊन त्याला ताठ मानेने उभे करण्याचे प्रयत्न असतील व त्यात आम्हाला हमखास यश मिळेल. 

नक्‍की पहा > खडसेंचा वेगळा विचार : शिवसेना, कॉंग्रेस की राष्ट्रवादी? 

"मला मंत्रिपद मिळावे, ही कार्यकर्त्यांची अपेक्षा' 
पाचोरा-भडगाव मतदारसंघातून मी पुन्हा रिपीट झाल्याने तसेच गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत आठशे कोटींची विक्रमी विकासकामे केल्याने व भविष्यातील परिपूर्ण विकासाचे व्हीजन समोर ठेवून त्या पद्धतीने नियोजन केल्याने सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे, अशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगून पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल. पक्षाने टाकलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे व एक सच्चा शिवसैनिक म्हणून पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून जनसेवा करणे हीच आपली भूमिका आहे. मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकासाचे आहे ते नियोजन यशस्वी करण्यासाठी एकदिलाने प्रयत्न होतील, असेही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mahavikas aaghadi MLA kishor patil