रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे हजारो प्रवासी अडकले 

jalgaon relway stations
jalgaon relway stations

जळगावः भादली ते जळगाव दरम्यान रेल्वेमार्गावर ओव्हरब्रिजसाठी तयार करण्यात आलेल्या पुलावर गर्डर टाकण्यासाठी आज मध्य रेल्वेतर्फे सकाळी नऊ ते दुपारी एकदरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. अनेक रेल्वेस्थानकांवर रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या. यात हजारो प्रवासी रेल्वेत अडकून पडले होते. दुपारी दोननंतर मेगा ब्लॉक संपल्यानंतर रेल्वेमार्ग पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्‍वास सोडला. मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वेगाड्या विविध स्थानकांवर थांबविल्या होत्या. 
मुंबईकडून येणाऱ्या गाड्या पाचोरा, माहेजी, म्हसावद, शिरसोली स्थानकांवर, तर सुरतकडून येणाऱ्या गाड्या धरणगाव, पाळधी स्थानकांवर, मध्य प्रदेशातून येणाऱ्या गाड्या रावेर, सावदा, निंभोरा तर नागपूरकडून येणाऱ्या गाड्या वरणगाव, बोदवड, भुसावळ स्थानकांवरच थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशी अडकून पडले होते. 

"एस.टी. बस'ला गर्दी 
बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना लहान स्थानकांवर बसमध्येच अडकून पडावे लागल्याने ताटकळत बसावे लागले होते. बऱ्याच ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयात आजपासून बारावीच्या परीक्षेचे पेपर्स सुरू झाले आहेत. बारावीचे परीर्क्षांथी नोकरदार, व्यापारी यांना या मेगा ब्लॉकमुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला होता. काहींनी बसने जाणे पसंत केले. 
भादली ते जळगाव मध्य रेल्वेमार्गावर तिसऱ्या लोहमार्गाचे स्लिपर टाकण्याचे काम सुरू आहे, तर तेथून जवळच असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरील गर्डर टाकण्याचेही काम करण्यात येणार होते. या कामासाठी आज चार तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. 
या मेगा ब्लॉकमुळे देवळाली-भुसावळ पॅसेंजर रद्द असल्याने चाळीसगाव, पाचोरा अन्य स्थानकांवरून नोकरी, व्यावसायानिमित्त तसेच शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एक्‍सप्रेसला मोठया प्रमाणावर गर्दी झाली होती. 

यामुळे या रेल्वेगाड्यांमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लहान स्थानक असल्यामुळे जेवणासह चहा, कॉफी, बिस्कीट, खाण्या-पिण्याचे पदार्थ उपलब्ध नसल्याने हाल झाले. तर ऐन महत्त्वाच्या वेळी प्रवासी गाड्या येणार नसल्याने जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आदी ठिकाणांसह मधल्या स्थानकांवर प्रथमच शुकशुकाट आढळून आला. 

गर्डरचे काम झालेच नाही 
तरसोद गावाजवळ पुलावर रेल्वेतर्फे गर्डर टाकण्याचे काम आज होणार होते. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने दोन मोठे गर्डर वर चढविण्यात आले. मात्र ऐनवेळी गर्डर पुढे सरकत नसल्याने सपोर्टेड अँगल वेल्डींगने कापण्यात आला. गर्डर टाकण्याचे काम झाले नाही. मात्र मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com