काम करण्यास परवानगी द्या..मिस्तरी, फर्निचरचे कारागीर घरी बसून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

शासनाने फर्निचरचे काम करणाऱ्यांना लॉकडाउनमधून सूट देण्यात यावी. आम्ही अनेक कामगार आहोत, जे हातावर पोट भरतात. नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच शासन मदत देईल.

जळगाव : फर्निचरचे काम करणारे, बांधकामावर सेंट्रीग काम करणाऱ्यांचे हातावर पोट असते. रोज मजुरी करायची, शनिवारी आठवड्याचा पगार घ्यायचा, बाजार करायचा अन्‌ त्यावर संसाराचा रहाटगाडा चालवायचा असा त्यांचा क्रम असतो. महिन्याभरापासून लॉकडाउनमुळे अशी कामे करणाऱ्यांना कामे करण्यास बाहेर पडता येत नाही. किती दिवस घरात राहणार? शासनाने एकतर आम्हाला कामावर जाऊ द्यावे अन्यथा वेतन द्यावे, अशी मागणी सेंट्रींगचे कामे करणारे मिस्तरी, फर्निचर कारागीरांची आहे. 

क्‍लिक कराः PHOTO कॅरम, बुद्धिबळ खेळून कंटाळलात...मग आता हे खेळ खेळा 

शासनाने वेतन द्यावे 
सचिन रामदास मिस्तरी ः लॉकडाउन सुरू झाल्यापासून हाताला काम नाही. घरची जबाबदारी माझ्यावर असल्याने कुटुंबांचे पोट कसे भरावे, असा प्रश्‍न आहे. फर्निचरचे काम करून मी उदरनिर्वाह करतो. रेशनवरील धान्य किती दिवस पुरणार. हाताला काम मिळाले, की रोजीरोटीचा प्रश्‍न सुटेल. एक महिना होत आला आता शासनाने फर्निचरचे काम करणाऱ्यांना लॉकडाउनमधून सूट देण्यात यावी. आम्ही अनेक कामगार आहोत, जे हातावर पोट भरतात. नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच शासन मदत देईल. फर्निचरचे काम करणाऱ्यांची त्यात नोंद नाही. त्यामुळे आम्हाला शासनाने सरसकट वेतन अथवा मदत द्यावी. 

कामगार, कारागीरांचा विचार करा 
रमेश बाविस्कर (मिस्तरी) ः आम्ही बांधकामावर सेंट्रींगची कामे करतो. महिना भरापासून हाताला काम नाही, घरी बसून आहोत. काम मिळाले, तर पोटापाण्याची सोय होते. आमच्यासह अनेक बांधकाम मजुरांचे हातावर पोट असते. शासनाने याचा विचार करावा. आम्ही सोशल डिस्टन्स पाळू. मात्र, आम्हाला काम करण्यास परवानगी द्यावी. 

आर्वजून पहा जळगावातील उद्योगाची चाके येणार रुळावर;  शंभरावर कंपन्या होणार सुरू
 

फर्निचरची कामे करू द्यावी 
अमोल जाधव ः लॉकडाउनमुळे आमच्या कुटुंबांची परवड होतेय. कुटुंबांतील सदस्यांना आठ ते दहा दिवस पुरेल एवढे धान्य घरात होते, ते आता संपले. केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हे समजत नाही. शासनाने किमान आम्हाला रोजची मजुरी करण्यासाठी सूट द्यावी. आम्ही गर्दी न करता कामे करू. 

महिन्यापासून मजुरी बंद 
सुपडू मिस्तरी ः फर्निचर बनविण्यासाठी दुसऱ्याच्या हाताखाली काम करावे लागते. आठ दिवस काम केल्यानंतर मजुरी मिळते. ती आता महिनाभर झाले बंद झाली आहे. घरातील वस्तू आता संपण्याच्या मार्गावर आहेत. आतातरी शासनाने आम्हाला कामासाठी साइटवर जाऊ द्यावे. कुटुंबीयांचा उदरनिर्वाह, ज्येष्ठांची काळजी, आगामी काळात मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च कसा करू, याची चिंता लागून आहे. 
 

नक्की वाचा :  दिलासादायक : त्या महिलेच्या संपर्कातील सात जणांचे अहवाल निगेटीव्ह 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Mistry, furniture craftsman sitting at home