"पाडळसरे'चे अपूर्ण काम हे महाजनांचे अपयश : आमदार अनिल पाटील

anil_bhaidas_patil.
anil_bhaidas_patil.

जळगाव : अमळनेर तालुक्‍यातील पाडळसरे प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांत आपल्या जिल्ह्यातील जलसंपदामंत्री असूनही मार्गी लागू शकले नाही. केंद्राच्या कुठल्याही योजनेत त्याचा समावेश करता आला नाही, हे सर्व मावळते मंत्री गिरीश महाजनांचे अपयश आहे, असे मत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केले. 
आमदार झाल्यानंतर अनिल पाटील यांनी प्रथमच "सकाळ'च्या जळगावातील मुख्य कार्यालयास भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. सुरवातीला "सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. पाटील यांनी "सकाळ'मधील सहकाऱ्यांशी संवाद साधला. 


पाठपुरावा केला नाही 
प्रत्येक निवडणुकीत पाडळसरे प्रकल्प हा प्रचाराचा मुद्दा असतो, परंतु दोन दशकांनंतरही प्रकल्पाचे काम मार्गी लागले नाही, याबद्दल छेडले असता अनिल पाटील म्हणाले, 1999 मध्ये प्रकल्पास मंजुरी मिळाल्यानंतर आतापर्यंत या प्रकल्पावर केवळ चार-पाचशे कोटी रुपयेच खर्च होऊ शकले आहे. त्यानंतर त्या-त्या आमदारांनी त्यासंबंधी पाठपुरावाच केला नाही. माजी आमदार तर या प्रकल्पाला "पांढरा हत्ती' म्हणून हिणवत होते. अशी मानसिकता असेल तर प्रकल्प कसा पूर्ण होणार? असा प्रश्‍नही आमदार पाटील यांनी उपस्थित केला. 

महाजनांचे अपयश कारणीभूत 
गेल्या पाच वर्षांत राज्यात भाजपचे सरकार होते, जिल्ह्यातील नेत्याकडे जलसंपदा खाते होते. त्यामुळे या कार्यकाळात पाडळसरेचे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री सिंचन किंवा बळीराजा सिंचन या केंद्र सरकारच्या योजनांमध्ये ते करू शकले नाहीत. त्यासाठी या प्रकल्पाच्या काही परवानग्या जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आल्या. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही, हे महाजनांचे अपयश आहे, असा आरोपही पाटील यांनी केला. अर्थात, असे असले तरीही हा प्रकल्प तालुक्‍याचेच नव्हे तर या संपूर्ण परिसराचे स्वप्न आहे. आणि आगामी पाच वर्षांत तो पूर्ण करण्याचा आपला संकल्प आहे, अशी ग्वाही अनिल पाटील यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com