
वारंवार थेट पक्ष व नेतृत्वावर टीका करणे, माझं काही खरं नाही, मी पक्ष केव्हाही पक्ष सोडू शकतो असं धमकावणे तसेच विधानसभा निवडणुकीनंतर गोपीनाथगडावर त्यांनी केलेले भाषण याच भूमिकेमुळे पक्ष प्रोटोकॉलनुसार त्यांचा फोटो घेणे मला नाइलाजाने टाळावे लागले.
जळगावः एकनाथराव खडसे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबाबत आपल्याला आदर आहे. मात्र, काही वर्षांपासून ते पक्षाबाबत घेत असलेली भूमिका वेदनादायी आहे. पक्षाच्या नेतृत्वावर ते वारंवार टीका करीत असल्यामुळेच पक्ष प्रोटोकॉलनुसार आपण केलेल्या जाहिरातीत त्यांचा फोटो नाइलाजाने टाळला, असे स्पष्ट मत चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
धक्कादायक...भडगावात आढळले 15 "कोरोना'बाधित; जिल्ह्याची रुग्णसंख्या 278 वर
खडसे यांनी भाजप नेतृत्वावर टीका केली, त्याला प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले. मात्र, प्रथमच पक्षाच्या एका आमदाराने हे थेट उत्तर दिले आहे. मंगेश चव्हाण हे चाळीसगाव येथील भाजपचे आमदार आहेत. अवघे 31 वर्षे वयाचे चव्हाण हे घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रथमच निवडणूक लढवून आमदार झाले आहेत.
राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. यात भाजपतर्फे रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रमेश कराड हे बिनविरोध निवडून आले. त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर आमदार चव्हाण यांनी चाळीसगाव शहरात लावले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तसेच आमदार गिरीश महाजन यांचे फोटो टाकले आहेत. त्यात भाजप नेते एकनाथराव खडसे यांचा फोटो त्यांनी घेतला नाही. त्यामुळे खडसे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी या बॅनरचा निषेध सोशल मीडियावर सुरू केला.
क्लिक कराः संरक्षण क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीस विरोध; आयुध निर्माणी संघटनांकडून निषेध
यात खडसे यांच्या समर्थकांनी म्हटले आहे, की ज्या खानदेशच्या प्रत्येक तालुक्यात भाजपच्या विस्तारासाठी रक्ताचं पाणी केलं, असा लोकनेता नाथाभाऊ यांचा फोटो नसल्याचं दुःख वाटतं. तुम्ही तरी एक खानदेशी आमदार म्हणून आपल्या खानदेशी लोकनेत्यावर अन्याय करू नका.
सोशल मीडियावर या निषेधाबाबत थेट आमदार चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की खडसे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून, त्यांच्याबाबत आपल्या मनात आदरभाव आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून ते घेत असलेली भूमिका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वेदना देणारी आहे. पक्षाविषयी नाराजी असू शकते. पण, वारंवार थेट पक्ष व नेतृत्वावर टीका करणे, माझं काही खरं नाही, मी पक्ष केव्हाही पक्ष सोडू शकतो असं धमकावणे तसेच विधानसभा निवडणुकीनंतर गोपीनाथगडावर त्यांनी केलेले भाषण याच भूमिकेमुळे पक्ष प्रोटोकॉलनुसार त्यांचा फोटो घेणे मला नाइलाजाने टाळावे लागले.
नक्की वाचा : सायकल आवडली अन् लंपास केली ; अल्पवयीन संशयीतांसह दोन दिवसात तीघे ताब्यात