माता अमृत मदर्स मिल्क बॅंकेमुळे 512 बाळांना मिळाले आईचे दूध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

मदर्स मिल्क बॅंकेस दूध दान करणाऱ्या माता, देणगीदार, पीपल्स बॅंक पाटील ट्रस्टचे पदाधिकारी, शाहू महाराज हॉस्पिटलमधील सर्व सहकारी, मदर्स मिल्क बॅंकेचे संचालक, सदस्य, रोटरी वेस्टच्या सर्व सदस्यांचे सहकार्य मिळते.

जळगाव ः येथील रोटरी क्‍लब जळगाव वेस्ट, दि जळगाव पीपल्स बॅंक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित "माता अमृत मदर्स मिल्क बॅंकेत वर्षभरात 253 मातांनी दूध दान केल्यामुळे 512 बाळांना त्याचा फायदा झाला असल्याची माहिती मदर्स मिल्क बॅंकेच्या चेअरमन संगीता प्रमोद पाटील यांनी दिली. 

संगीता पाटील म्हणाल्या, की गेल्या वर्षभरात जनजागृती अभियान राबवून मिल्क बॅंकेची माहिती पोचविण्याचा प्रयत्न केला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मदर्स मिल्क बॅंकेस दूध दान करणाऱ्या माता, देणगीदार, पीपल्स बॅंक पाटील ट्रस्टचे पदाधिकारी, शाहू महाराज हॉस्पिटलमधील सर्व सहकारी, मदर्स मिल्क बॅंकेचे संचालक, सदस्य, रोटरी वेस्टच्या सर्व सदस्यांचे सहकार्य मिळते. यात हॉस्पिटलचे व्यवस्थापक संतोष नवगाळे, सुमन लोखंडे, वैशाली काळे, जनजागृतीसाठी सरिता खाचणे व राजेश परदेशी यांचे विशेष योगदान लाभत आहे. 

नक्की वाचा :   बापाला झाली अटक...बदनामीपोटी मुलाने उचलले टोकाचे पाऊल! 
 

नवजात शिशूंना लाभ 
प्रकाश चौबे (अध्यक्ष पाटील ट्रस्ट) : उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागातील या पहिल्या मदर्स मिल्क बॅंकेचा 7 मार्च 2019 ला शुभारंभ झाला. रोटरी वेस्ट व पीपल्स बॅंक पाटील ट्रस्ट यांनी सामाजिक भावनेतून ही मिल्क बॅंक श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये सुरू केली. वर्षभरात शेकडो नवजात शिशूंना लाभ झाला. 

बाळासाठी अमृत 
डॉ. प्रीती जोशी (मिल्क बॅंकेच्या समिती सदस्य) : आईचे दूध बाळासाठी प्रोटिन युक्त, सर्वोत्तम आहार मानला जातो. त्याचा बाळाला व आईला देखील फायदा होतो. मात्र आईला दूध कमी येणे, काही कारणांमुळे आईपासून बाळाला अतिदक्षता विभागात ठेवावे लागणे किंवा दुर्दैवाने काही वेळा बाळाची आई दगावते अशा प्रसंगी बाळाला दुधासाठी माता अमृत मदर्स मिल्क बॅंक योग्य पर्याय आहे. 

क्‍लिक कराः  पाचोरा, भडगावातील वनक्षेत्र होणार बंदिस्त 
 

बाळाची प्रतिकारशक्ती वाढते 
डॉ. एन. एस. चव्हाण (जिल्हा शल्यचिकित्सक व स्त्रीरोगतज्ज्ञ) : आईच्या दुधामुळे बाळाला पोषकद्रव्ये व जीवनसत्त्वे मिळतात, त्याची प्रतिकारशक्ती वाढते, ते दूध पचायला सोपे व आरोग्यवर्धक असते. मातेने स्तनपान केल्यामुळे बाळंतपणानंतरचा रक्तस्राव कमी होतो. बांधा पूर्ववत होण्यास मदत होते. 
 

आर्वजून पहा : नर्मदा बचावाचे आंदोलन...अफरोज अहमद गो बॅक'चा नारा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Mother Nectar Mothers Milk Bank 512 babies received breast milk