पाचोरा, भडगावातील वनक्षेत्र होणार बंदिस्त ! 

forest
forest

पाचोरा : पाचोरा व भडगाव तालुक्यातील वन क्षेत्रातील वन्यजिवांमुळे शेतीचे होणारे नुकसान तसेच हानी रोखण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी शासन दरबारी वनक्षेत्र बंदिस्त करण्याची मागणी करून त्याचा पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून या दोन्ही तालुक्यातील संपूर्ण वनक्षेत्राला लोखंडी संरक्षक जाळी बसविण्यासंदर्भातील आदेश वनमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील वनक्षेत्र बंदिस्त होऊन त्याचा वन्यजिवांसह शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. 

गेल्या चार- पाच वर्षांपासून पाचोरा व भडगाव तालुक्यातील वनक्षेत्रातील बिबट्या, नीलगायी, रानडुक्कर, काळवीट, तरस, हरण यासारख्या वन्यजिवांमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. शिवाय वन्यक्षेत्रालगतच्या गावांमध्ये मानवी वस्तीत येऊन वन्यजिवांपासून शेतकरी व ग्रामस्थांना धोका निर्माण होत होता. शेतांमध्ये सालदार कुटुंबीयांसह मजुरांवर वन्यजिवांनी जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. वनक्षेत्रातील वन्यजीव वनक्षेत्राबाहेर येऊ नयेत आणि त्यामुळे शेती अथवा मानवी जीविताची हानी होऊ नये म्हणून वनक्षेत्राला सुरक्षित लोखंडी कुंपण करावे, अशी मागणी सातत्याने होत होती. 

वनमंत्र्यांनी दिले आदेश 
या संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्याआधारे शासनाने या मागणीला सकारात्मक मान्यता दर्शवली. शासन निर्णयाच्या आधारे आमदार किशोर पाटील यांनी जानेवारी २०२० मध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन योजनेंतर्गत वनक्षेत्राला संरक्षक लोखंडी जाळी बसविण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष वनमंत्र्यांना भेटून त्यांनी वन्यजिवांमुळे होणाऱ्या नुकसानीचे गांभीर्य मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिले होते. त्यामुळे मंत्री संजय राठोड यांनी सचिवांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. यामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व वनक्षेत्र आता लोखंडी जाळीने बंदिस्त होणार असून वन्यजिवांपासून होणारी हानी थांबण्यास मदत होणार आहे. 

हे क्षेत्र होणार बंदिस्त 
पाचोरा तालुक्यातील आसनखेडा खुर्द, आसनखेडा बुद्रूक, मोहाडी, नांद्रा, राणीचे बांबरुड व पहाण या गावांचा तर भडगाव तालुक्यातील पेंडगाव, जुवार्डी, पथराड, आडळसे, शिंदी व शिवणी या वनक्षेत्रालगतच्या गावांचा समावेश आहे. या निर्णयामुळे वनक्षेत्राबाहेर येऊन शेतीचे व मानवी जीविताचे नुकसान करणाऱ्या वन्यजिवांपासून संरक्षण होणार आहे. ज्यामुळे भविष्यातील नुकसानीची भीतीही संपुष्टात येण्याचे सुचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील वनक्षेत्रालगतच्या ग्रामस्थांकडून आमदार किशोर पाटील यांना धन्यवाद दिले जात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com