esakal | पाळधी-खोटेनगर, तरसोद फाट्यापर्यंतची केवळ दुरुस्ती होणार 

बोलून बातमी शोधा

jalgaon higway imege

कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतच्या रस्त्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग होत असले, तरी त्याचे चौपदरीकरण होणार नसल्याने वाहतुकीची समस्या कायम राहणार आहे

पाळधी-खोटेनगर, तरसोद फाट्यापर्यंतची केवळ दुरुस्ती होणार 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः शहरातून जाणाऱ्या महामार्गावर केवळ खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंतच चौपदरीकरण होणार असल्याने पाळधी ते खोटेनगर व पुढे कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतच्या रस्त्याची जबाबदारी "न्हाई'ने नाकारून सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारली असली, तरी या अवघ्या पाच-सात किलोमीटरच्या टप्प्यांची केवळ दुरुस्तीच होणार असून चौपदरीकरण होणार नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे याच टप्प्यातून शैक्षणिक संस्थांचे व उद्योगांतील हजारो कर्मचारी, विद्यार्थी ये-जा करीत असल्याने त्यांनी या दोन्ही टप्प्यांतील चौपदरीकरणाची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

बांधकाम विभाग केवळ दुरुस्ती करणार 
चौपदरी महामार्ग पाळधीपासून बायपास निघून तरसोद फाट्यापर्यंत येतो. त्यामुळे पाळधी ते खोटेनगर व कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतच्या टप्प्यातील रस्त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यापैकी पाळधी ते खोटेनगरपर्यंतच्या टप्प्याचे नाहरकत पत्र बांधकाम विभागास प्राप्त झाले आहे. त्याची दुरुस्ती म्हणजे, साइडपट्टी डांबरीकरण व खड्डे दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 कोटींचा निधी दिला असून, त्याची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. अद्याप त्यास प्रतिसाद मिळालेला नाही, तर कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतच्या रस्त्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग होत असले, तरी त्याचे चौपदरीकरण होणार नसल्याने वाहतुकीची समस्या कायम राहणार आहे. 

नक्की वाचा : घरी पोहचणार... तेवढ्यातच होत्याचे नव्हते झाले ! 
 

अर्धवट कामाला अर्थ नाही 
जळगाव शहरातून हजारो विद्यार्थी या रस्त्याने जीव मुठीत धरून प्रवास करतात. महापालिका परिक्षेत्रात महामार्गाचे काम होत आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पाळधीपर्यंत रस्त्याचे काम अपेक्षित असताना अर्धवट कामाचा घाट घातला जातोय. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पथदिव्यांकडे लक्ष द्यायला हवे. अंधारात चालणाऱ्यांना त्याचा त्रास होतो. 
डॉ. संजय शेखावत (संचालक, एसएसबीटी महाविद्यालय) 

आणखी किती कुंकू पुसले जाणार? 
महामार्गाने प्रवास करताना घरी परत जाणार की नाही याची शाश्‍वती नसते. अनेकांच्या कपाळाचा कुंकू तर काहींचा वंशाचा दिवा या महामार्गावर आजवर हिरावला गेला. मात्र, तरीही गेंड्याच्या कातडीचे प्रशासन उपाययोजना करण्याऐवजी त्यातून पळ काढताना दिसत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन जळगावकरांच्या व्यथा- वेदना समजून घ्याव्यात व महामार्ग चौपदरीकरणाचे काम थेट पाळधीपर्यंत करावे. 
 डॉ. हर्षल तारे (प्राचार्य, त्रिमूर्ती कॉलेज) 

सहनशीलतेचा अंत पाहू नका 
महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. शेकडो नागरिकांचे प्राण जाऊनही रस्ता रुंदीकरण होत नसेल तर यापेक्षा दुर्दैव दुसरे नाही. वेळोवेळी नागरिक रस्त्यावर उतरले; पण त्याचा प्रशासनाला फारसा फरक पडलेला नाही. सामान्य नागरिक शांत आहेत, त्यांच्या उद्रेकाची प्रशासनाने वाट बघू नये अन्यथा जनता कायदा हातात घेईल व त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. 
 डॉ. सत्यजित साळवे (विद्यार्थी कल्याण अधिकारी, उमवि)

आर्वजून पहा : गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली ! 

परिस्थिती "जैसे थे' राहणार 
महामार्ग चौपदरीकरणाचे काम पाळधी बायपासपासून थेट तरसोद फाट्यापर्यंत झाले नाही तर परिस्थिती "जैसे थे' राहील. प्रशासनाने जनभावनेचा आदर करून प्रस्तावित कामाला गती द्यावी व तरसोद फाट्यापर्यंत काम करावे. पावसाळा सुरू होण्याआधी काम पूर्ण करावे. महामार्गावर अपघात होऊन आणखी बळी जाणार नाहीत, याची दक्षता घ्यायला हवी. महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. याचाही गांभीर्याने विचार करावा. 
 डॉ. व्ही. एच. पाटील (गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय) 

जनते च्या जिवाशी खेळू नका
प्रशासनाने महामार्ग रुंदीकरण करताना लोकसंख्यावाढीचा विचार करावा. प्रस्तावित कामकाजात बदल करून तरसोद फाट्यापर्यंत रुंदीकरण करावे. मोठ्या प्रमाणात वर्दळ या भागात आहे. अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. हा प्रकार गंभीर असून भविष्यात या घटना घडणार नाहीत, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. शहरातून बाहेर जाणारा व पुन्हा शहरात येणारा वर्ग मोठा आहे. 
 डॉ. प्रशांत वारके (संचालक, गोदावरी आएएमआर महाविद्यालय) 

क्‍लिक कराः  आई उभी राहली...अन्‌ चिमुकला खिडकीतून झाला गायब !