फक्त जीवनाश्‍यकच वस्तूंची दुकाने सुरू राहणार : जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे 

फक्त जीवनाश्‍यकच वस्तूंची दुकाने सुरू राहणार : जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे 

जळगाव : जळगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर व चोपडा या शहरातील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने उद्यापासून (ता.20 मे) 17 मेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिले आहेत. 

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढती संख्या लक्षात घेता त्यावर तातडीने उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आज जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण नोडल अधिकारी उपस्थित होते. 

रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्क्रिनींग 
जिल्हाधिकारी डॉ ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्क्रिनींग वाढविण्यात आले आहे. याकरीता जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्येही संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज जरी रुग्ण वाढत असले तरी भविष्यातील धोका यामुळे कमी होणार आहे. बाधित रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर आवश्‍यक ते उपचार झाल्याने त्यांच्यापासून होणारा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. 

कंटन्मेंट झोनमध्ये बंदीजिल्ह्यातील कंटन्मेंट क्षेत्रातील कोणाही व्यक्तींला त्या क्षेत्राबाहेर जाता अथवा येता येणार नाही. या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात. या भागातील नियंत्रणासाठी स्थानिकांची मदत घ्यावी. कंटेन्मेंट क्षेत्रातील कोणीही व्यक्ती लॉकडाऊन संपेपर्यंत कुठल्याही सार्वजनिक आस्थापनेत कामावर येणार नाही याची खबरदारी संबधित आस्थापनांनी घ्यावयाची आहे. 

वैद्यकीय कारणांसाठीच ये-जा 
या क्षेत्रातील ज्या नागरिकांना उच्च रक्तदाब, डायबेटिस व इतर आजार असतील व त्यांना तातडीने उपचार, औषधे घेणे, तपासणी करणे आवश्‍यक असेल तर अशा नागरिकांसाठी नियंत्रण अधिकारी सुचनेनुसार वाहन व्यवस्था करतील. कोविड केअर सेंटरवर नियंत्रण ठेवण्यासाठीही अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येतील. 

आयुक्त, सीईओंकडे नियंत्रकांचा भार 
जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रातील दवाखान्यांना आवश्‍यक बाबींसाठी आयुक्त सतीश कुलकर्णी तर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केद्रांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील हे नियंत्रक अधिकारी राहतील. या दवाखान्यांमध्ये रुगणांवर तातडीने उपचार होण्यासाठी पॅरामेडिकल स्टाफची नियुक्ती करणे, या रुग्णालयांमध्ये लागणारी औषधे व उपचार साधने पुरविणे, कोरोना योध्दांची नियुक्ती करण्याचे अधिकारी या अधिकाऱ्यांना देण्यात येतील. प्रत्येक कोविड केअर सेंटरला आयुर्वेदिक डॉक्‍टरांची नेमणुक करावी. 

पुण्यात विद्यार्थ्यांना जाण्याची सोय 
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरीकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्‍चित केले आहे. शैक्षणिक कारणासाठी जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे पुण्याचे जे विद्यार्थी अडकलेले असतील त्यांची जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी फक्त विद्यार्थ्यांनीच प्रांताधिकारी दिपमाला चौरे (9923567449), उपजिल्हाधिकारी किरण सावंत 
(7588591846) या क्रमांकावर आपले नाव, शिक्षणसंस्थेचे नाव व जाण्याचे ठिकाण याबाबतचा संदेश पाठवावा (कॉल करु नये). त्यानुसार भुसावळ येथून लखनौला जाण्यासाठी ट्रेन रवाना करण्यात आली आहे. त्याचधर्तीवर बिहार व प. बंगालसाठी ट्रेनचे नियोजन करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com