विरोधी पक्षनेते फडणवीस राजभवनातच जास्त दिसतात-गृहमंत्री देशमुख यांची टीका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020


जळगावचे नमुने अकोल्याला पाठविणार 
जिल्हाधिकारी डॉ.. ढाकणे यांनी सांगितले, की जिल्ह्यातील त्रिस्तरीय रचनेनुसार जिल्ह्यात 8 हजार बेड तयार करण्यात आले असून 24 हजार बेड तयार करण्याचे नियोजन आहे. मालेगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने धुळे येथील प्रयोगशाळेत कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासणी अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. जळगावच्या संशयितांचे नमुने अकोला प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. 

जळगाव ः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनातच जास्त दिसतात. या परिस्थितीत सर्व पक्षांनी या लढाईमध्ये एकत्र काम करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आम्हाला राजकारण करायचे नाही, असा टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल(ता.28) येथे केली. 
गृहमंत्री देशमुख काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. 

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे, राज्यात काय चित्र आहे. असा प्रश्‍न त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनातच जास्त दिसतात. मी नागपूरवरुन दौऱ्याला सुरवात केली आहे. राज्यात अधिकारी, कर्मचारी चांगले काम करीत आहेत. जळगावात प्रशासनाचे अधिकारी चांगले काम करीत आहेत. राज्य शासनाच्या सूचना सर्वांनी पाळल्या तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. महाराष्ट्रात मुंबई, मालेगाव हे हॉटस्पॉट आहेत. 

नक्की वाचा ः अरे हे काय..एकाच आठवडयात भाजप नगरसेवकाने केले दोन प्रताप ​
"कोरोनावर'लॉकडाऊनच प्रभावी 
कोरोनाची साखळी तोडून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल येथे केले. 

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याची कोरोनाचा परिस्थिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री यांनी आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. 
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.. एन. एस. चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, ऍङ. रवींद्र पाटील, अभिषेक पाटील उपस्थित होते. 

हेही वाचा ः विद्यार्थ्यांचे संशोधन..."कोरोना'ला रोखण्यासाठी "थ्रीडी प्रिंटेड मास्क

परप्रांतीय मजूरांबाबत राज्यस्तरावरुन निर्णय 
गृहमंत्री देशमुख म्हणाले की, पुढील महिन्याच्या धान्याचे वाटप करताना कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. धान्यवाटपाचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्याl. निवारागृहात असलेल्या परप्रांतीय मजूरांबाबत राज्यस्तरावरुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सर्व मजुरांची व्यवस्थित काळजी घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. 

जिल्हा बॅंकेने रोख रक्कम द्यावी 
सध्या शेतीचा खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासाठी तातडीने पैशांची आवश्‍यकता असल्याने सहकारी बॅंकांनी शेतकऱ्यांना आवश्‍यक असलेली रक्कम एकरक्कमी रोखीने देण्यात यावी. जेणेकरून त्यांना वारंवार रक्कम काढण्यासाठी एटीएमला यावे लागणार नाही अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon opostiion leader fadanvis see mostly in raj bhavan