कजगावचे आरोग्य केंद्र डॉक्टरांविना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित डॉक्टरांना नोटीस बजावली आहे. यापूर्वीही ग्रामस्थांकडून त्यांच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आज आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा देण्यासाठी मुख्यालयात थांबणे गरजेचे होते. तसे आदेश वरिष्ठ स्तरावरून मिळालेले आहेत. मात्र, संबंधित डॉक्टर हजर नसतील तर तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू. याबाबत जो काही निर्णय व्हायचा तो वरिष्ठ स्तरावरुन होईल 
- डॉ. प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी, कजगाव (ता. भडगाव) 

कजगाव (ता. भडगाव) : सध्या सर्वत्र ‘कोरोना’मुळे आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र, एका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य सेवा देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना किमान सध्याच्या परिस्थितीत तरी रुग्णालयात थांबणे बंधनकारक करावे, अशी मागणी होत आहे. 

नक्‍की वाचा - जनता कर्फ्यु : भुकेने व्याकुळ मनोरुग्णास दिले अन्न- पाणी

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कजगावसह आजूबाजूच्या गावांमधील रुग्णांना सेवा दिली जाते. या ठिकाणी होणारी रुग्णांची गर्दी लक्षात घेता, दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. यापैकी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील पाटील हे मुख्यालयात दिसून आले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यात आली. रुग्णालयात उपस्थित असलेले दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांनी येणाऱ्या रुग्णांवर उपचार केले. त्यांच्याकडे कजगावसह गुढे व इतर ठिकाणची अतिरिक्त जबाबदारी आहे. कजगावला दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे असताना दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी थांबणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित डॉक्टरांकडून आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडले जात नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

हेपण पहा -जनता कर्फ्यू लागण्यापुर्वी मध्यरात्रीच शुभमंगल सावधान... 

डॉक्टरांना निवेदन 
या संदर्भात ग्रामस्थांनी रुग्णालयात गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांना दिले. निवेदन देतेवेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अनिल महाजन, उर्दू शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाजीम मणियार, संजय महाजन, लालसिंग पाटील, प्रशांत पाटील, राकेश महाजन, पिंटू कुंभार, स्वप्नील सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी 
कजगावला दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र, दोन पैकी एकच वैद्यकीय अधिकारी येथे उपस्थित असतात. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पाटील हे बऱ्याचदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नाहीत. आज संपूर्ण देशात कोरोना आजारामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्यांची ड्यूटी आहे, अशा डॉक्टरांनी दवाखान्यात थांबायला पाहिजे होते. डॉ. स्वप्नील पाटील हे उपस्थित नसल्याने त्यांना फोन केला असता, त्यांनी ‘माझी तब्येत बरी नाही, मी येऊ शकत नाही’ असे उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे संबधित डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अनिल महाजन यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kajgaon phc no docter avalable patients other hospital