अमरावती धरणाच्या कालव्यांच्या दुरवस्थामूळे वाहू लागले पाणी सैरावैरा 

अमरावती धरणाच्या कालव्यांच्या दुरवस्थामूळे वाहू लागले पाणी सैरावैरा 

दोंडाईचा ः मालपूर (ता.शिंदखेडा) येथील अमरावती मध्यम प्रकल्पाचे कालवे सक्षम नसल्याने पाणी सैरावैरा वाहत आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यांना अनेक ठिकाणी गळती आहे. त्यामुळे शेतीतील पिकांचे नुकसान, तर काही ठिकाणी कालव्यातून पाणी अक्षरशः सैरावैरा वाहून वाया जात असल्याचे चित्र आहे. संबंधित विभागाने प्रत्यक्ष कालव्यांवर फिरून समस्या जाणून घ्यावी मगच पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

आठवडाभरापूर्वी अमरावती धरण परतीच्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरले. लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कालव्यातून पाणी सोडण्यात आले. दरम्यान पाण्याची आवक वाढत असल्याने दोन दिवसापूर्वी अमरावती नदीपात्रात १२० क्युसेस पाण्याचा विसर्ग चार तास सोडण्यात आला. मात्र कालव्यातून पाणी सुरूच आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यांना मोठ्या प्रमाणावर गवताचे व झुडपांच्या साम्राज्य आहे. त्यातून पाणी पुढे सरकण्यास अडथळा होत आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबत असते, ते लगतच्या शेतात पाझरत आहे, म्हणून पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे. सैरावैरा वाहत जाणाऱ्या पाण्याची नासाडी टाळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

उजवा कालवा सात किलोमीटर लांबीचा आहे. त्यावर पाच उपवितरिका तयार करण्यात आलेल्या आहेत. विखरण, मेथी, वरझडी गावाचे पाझर तलाव भरण्यासाठीचे वाढीव सात किलोमीटरच्या कालवा निर्मिती देखील संबंधित विभागाकडून मार्गी लागलेला नाही. तिथपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी कालव्यातील पाण्याचे वहन योग्यरीत्या झाले. १८६० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. 

 
डावा कालवाही साडेसात किलोमीटरचा आहे. त्यावरही पाच वितरिका आहेत, तर एक पुच्छ वितरिका आहे. त्याच्या पाण्यावर १०४६ हेक्टर जमिन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. दोन्ही कालवे मिळून सुमारे तीन हजार हेक्टर जमीन धरणाच्या पाण्याने सिंचनाखाली येऊ शकणार आहे. 


७० लाखांचा प्रस्‍ताव 
धरणात पुरेसा साठाच होत नसल्याने कालव्यांकडे साफ दुरूस्तीकरण, गळती अन्य कालव्याच्या कामासाठी सुमारे ७० लाखाचा निधी मागितला असल्याचा प्रस्ताव संबंधित विभागाने दिला असल्याचे सांगण्यात येते. गेली चौदा वर्ष अमरावती धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांकडे आता तरी लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com