धक्कादायक : मालेगाव बंदोबस्तातील धुळ्याचा एसआरपी जवान कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

एसआरपी'च्या येथील 82 जवानांचा समावेश असून खबरदारीसाठी त्यांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली होती. त्यातील एक जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळला.

धुळे : राज्यात संसर्गजन्य कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावला (जि. नाशिक) धुळ्याची "एसआरपी'ची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात होती. यातील एका जवानाला या आजाराची लागण झाली आहे. जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाने आज सायंकाळी ही माहिती दिली. त्यामुळे "एसआरपी'च्या तंबूत चिंतेचे वातावरण असून बंदोबस्तातील 81 जवानांना धुळे शहरातीलच पोलिस प्रशिक्षण केंद्रात पूर्णतः खबरदारी घेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.

नक्‍की पहा - अन्‌ बंदोबस्तातून पोलिसांनी काढला पळ...काय आहे कारण वाचा

शहरातील साक्री रोडवरील जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात (सिव्हील) पहिल्या सहा दिवसात कोरोना विषाणूच्या संशयित 149 रुग्णांची तपासणी झाली आहे. त्यात मालेगाव येथे 27 एप्रिल ते 1 मेपर्यंत बंदोबस्तास असलेल्या "एसआरपी'च्या येथील 82 जवानांचा समावेश असून खबरदारीसाठी त्यांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली होती. त्यातील एक जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळला. मालेगावनंतर संबंधित जवानांना गडचिरोली येथे बंदोबस्तासाठी पाठविले जाणार होते. त्यांना आता 21 दिवस क्वारंटाईन केले जाईल.

धुळे जिल्ह्यात 32 रूग्ण
धुळे महापालिका हद्दीत संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'चा विळखा वाढत चालला असून त्याचे शनिवारी सायंकाळनंतर आणखी तीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते. त्यामुळे महापालिका हद्दीतील रूग्णांची संख्या 23, तर साक्रीतील चार, शिरपूर व शिंदखेडा तालुक्‍यातील प्रत्येकी दोन रूग्णांमुळे जिल्ह्याचा एकूण आकडा 31 वर पोहोचला होता. त्यात एसआरपीच्या जवानाची भर पडल्याने धुळे शहरातील कोरोनाची रूग्ण संख्या 24, तर जिल्ह्याची एकूण संख्या 32 वर पोहोचली आहे. या स्थितीमुळे चिंता व्यक्त होत असून महापालिका हद्दीत सात ते आठ प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर झाले आहेत. ते प्रशासनाने "सील' केले आहेत. शिवाय काही अटीशर्तींसह दुपारी दोननंतर शहरात संचारबंदी आणि पूर्णत ः "लॉक डाऊन'चा आदेश लागू आहे.
येथील आझादनगर क्षेत्रातील गरीब नवाज नगरमधील पूर्वीच बाधीत 28 वर्षीय रूग्णाची 40 वर्षीय आई आणि 83 वर्षीय आजीला "कोरोना'ची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला होता. यापाठोपाठ ह्रदयावर बासपास शस्त्रक्रियेसाठी 27 ला नाशिक येथे रवाना झालेले गल्ली क्रमांक सहाच्या परिसरातील आणि आग्रा रोडवरील पोलिस चौकी समोरील परिसरातील 65 वर्षीय कापड व्यावसायिकाला नाशिक येथे "कोरोना'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात धुळे शहरातील चौघांचा, तर साक्रीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयातील कोरोना कक्षातील दोघांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news malegaon duty dhule SRP candidate corona positive