रस्त्यावरील केबल जाळून तारांची विक्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

जामदा व मेहूणबारे शिवारात ‘जेसीबी’च्या साहाय्याने रस्ता खोदकाम करताना या भागातून गेलेल्या भारत दूरसंचार निगम लिमीटेडसह शेतांमध्ये असलेल्या विविध टॉवरच्या कंपनींच्या भूमिगत केबल निघत आहेत.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सध्या एंरडोल- येवला या राज्य महामार्गाचे काम सुरू असून या कामात रस्त्याचे खोदकाम करताना दूरसंचार विभागासह इतर विविध खाजगी कंपनींच्या भूमिगत केबल तुटलेल्या अवस्थेत निघत आहेत. या केबलची चोरी करणारी टोळी या भागात सध्या चांगलीच सक्रिय झाली आहे. जमिनीतून निघालेल्या केबल जाळून त्यातील तारांची विक्री केली जात असल्याचा प्रकार सध्या सर्रास होत आहे. या प्रकाराची संबंधित विभागाने दखल घेऊन चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

हेपण पहा -चाळीसगावात होतोय ‘नॅनो रिव्हर लिंक पूल’

लवकरच येवला- सायगाव- मेहुणबारे- बहाळ या रस्त्याचेही भाग्य उजळणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे २४७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ‘हायब्रीड अॅन्युईटी’ अंतर्गत या रस्त्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. परिसरातील जामदा व मेहूणबारे शिवारात ‘जेसीबी’च्या साहाय्याने रस्ता खोदकाम करताना या भागातून गेलेल्या भारत दूरसंचार निगम लिमीटेडसह शेतांमध्ये असलेल्या विविध टॉवरच्या कंपनींच्या भूमिगत केबल निघत आहेत. या कामात निघणाऱ्या केबल चोरीचा सपाटा सध्या अज्ञात चोरट्यांनी सुरू ठेवला आहे. या केबलमधील तांब्याची तार काढून ती काळ्या बाजारात विक्री करणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक, या खोदकामाच्या वेळी दूरसंचार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जातीने लक्ष घालणे महत्त्वाचे आहे. मात्र, सध्या दूरसंचार विभागात स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. चाळीसगाव ते जळगाव या राज्य मार्ग क्रमांक १९ चे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्गात झाले आहे. तत्कालीन युती शासनाने गिरणा पट्ट्यातून जाणाऱ्या येवला- सायगाव- मेहूणबारे- जामदा- बहाळ- कोळगाव- भडगाव- एरंडोल या राज्य मार्ग क्रमांक २५ ला दोन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. त्यासाठी सुमारे २४७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यात सायगाव ते बहाळ या ५६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १०७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे, त्याला या कामात निघणाऱ्या केबलबाबत संबंधित विभागाला माहिती देणे आवश्‍यक असताना ती दिली जात नसल्याने खोदकामात केबल निघाल्यानंतर कोणीही दखल घेत नाही. चाळीसगाव तालुक्यातील सायगाव, पिलखोड, उपखेड, वरखेडे, मेहुणबारे, जामदा, बहाळ, कोळगाव, भडगाव व एरंडोल असा हा रस्ता असून या भागात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर केबल चोरीला गेली आहे. आतापर्यंत अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची केबलमधील तांब्याची तार चोरून नेल्याचे दिसून येत आहे. 

रस्त्यावरच केबल जाळून चोरी 
सद्यःस्थितीत या मार्गावर ठिकठिकाणी तांब्याची तार काढून केबल जाळलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. ही तार बाजारात शंभर ते सव्वाशे रुपये किलो दराने विकली जाते. प्राप्त माहितीनुसार, केबलची चोरी करणारे रस्त्याच्या काम करणाऱ्यांसोबत ओल्या पार्ट्याही करीत असतात. याबाबत कुठेही अद्याप कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. यात सर्वाधिक नुकसान ‘बीएसएनएल’चे झाले असून त्यांचीच मोठ्या प्रमाणावर केबल या भागात चोरीला गेली आहे. त्यामुळे दूरसंचार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी व पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare bsnl cable fire and Wire Sale