ज्याची प्रतीक्षा मेहुणबारेकरांना होती, ते इथे पहिल्यांदाच घडलं...

दीपक कच्छवा
गुरुवार, 21 मे 2020

मेहुणबारे पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शवविच्छेदन याच ठिकाणी होईल.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः येथील ग्रामीण रुग्णालयात इतर सर्व सुविधा उपलब्ध असताना केवळ शवविच्छेदनच होत नव्हते. तब्बल बारा वर्षांपासून ‘शो पीस’ ठरलेल्या येथील शवविच्छेदनगृहात आज विसापूर तांडा (ता. चाळीसगाव) येथील ६५ वर्षीय वृद्धाच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. हे पहिलेच शवविच्छेदन ठरले. या रुग्णालयात शवविच्छेदनाची सुविधा कार्यान्वित करण्यासंदर्भात ‘सकाळ’ने सुरवातीपासूनच पाठपुरावा केला होता. शवविच्छेदनाची सोय सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय थांबली आहे.

नक्की वाचा : जमिनी वनखात्याच्या, निर्णय घेणारी यंत्रणा महसूलची 

येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातील सुमारे ५९ खेड्यांतील रुग्णांचा संपर्क येतो. या ठिकाणी इतर सर्व सुविधा सध्या उपलब्ध असल्या तरी शवविच्छेदनच तेवढे होत नव्हते. या संदर्भात ‘सकाळ’ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य शशिकांत साळुंखे यांनी तर थेट आरोग्य मंत्र्यांकडेच हा विषय नेऊन मार्गी लावण्याचे सांगितले होते. अखेर आरोग्य विभागाने दखल घेऊन या ठिकाणी शवविच्छेदन सुरु केले जाईल, असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी काढले होते. या आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी केली. त्यानुसार, आज पहिलेच शवविच्छेदन येथे करण्यात आले.

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढतोय 
 

वृद्घाचे केले शवविच्छेदन
घरून शेतात गेलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा गिरणा पाटाच्या चारीत मृतदेह आढळून आल्याची घटना विसापूर तांडा (ता. चाळीसगाव) येथे आज पहाटे उघडकीस आली. रोहिदास दुबा पवार (६५) हे नेहमीप्रमाणे आज पहाटे चारच्या सुमारास दरेगाव शिवारातील शेतात पायी फिरायला गेले होते. मात्र, ते सकाळी नेहमीप्रमाणे घरी आले नाही म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, अकराच्या सुमारास चिंचगव्हाण शिवारातील १२ नंबर गिरणा पाटाच्या चारीमध्ये ते मिळून आले. रोहीदास पवार यांचा मुलगा मुकुंदा याने वडिलांना ओळखले. मृत रोहीदास पवार यांचा मृत्यू पाय घसरून झाला की अन्य कुठल्या कारणाने झाला हे अद्याप समजू शकले नाही. याबाबत मेहुणबारे पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शवविच्छेदन याच ठिकाणी होईल, असे डॉ. बाविस्कर यांनी सांगितल्याने त्यांच्या सूचनेवरून डॉ. वैदेही पंडित यांनी शवविच्छेदन केले.

क्‍लिक कराः तरुणाने "कोरोना'वर केली मात... दहाच दिवसांत "ओके',  पुष्पवृष्टीने स्वागत 
 

मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात आजपासून शवविच्छेदन सुरू झाले आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आता चाळीसगावला मृतदेह न आणता मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावा. या सुविधेमुळे आता ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबली आहे.
- डॉ. बी. पी. बाविस्कर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare fist dede boody by post mearten room