शेतकऱ्यांकडून लाच घेणाऱया कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापकला अटक 

शेतकऱ्यांकडून लाच घेणाऱया कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापकला अटक 

नंदुरबार ः कृषी विभागातर्फे शेतकरी गटांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या कृषी निविष्टा व बियाणे पुरविल्याचा मोबदल्यात गटातील प्रति शेतकऱ्याकडून २५० रूपये असे एकूण ३५ शेतकऱ्यांकडून ८ हजार ७५० रूपयाची लाच स्वीकारताना कृषी विभागातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकास (कंत्राटी) नवापूर येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही घटना सोमवारी घडली. 

याबाबत लाच प्रतिबंधक विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या शेतकरी गटासाठी शासनामार्फत मोफत बी -बियाणे व खते देण्याची योजना आहे. त्यासाठी शेतकरी एकत्र येऊन गट स्थापन करून कायदेशीर रजिस्ट्रेशन करून त्याची यादी शेतकरी उत्पादक कंपनीला सादर केली जाते. कंपनीमार्फत जिल्हा पातळीवर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सदर बी- बियाणे निविष्टा यांची मागणी करतात. संबंधित कार्यालयाकडून तालुका पातळीवर आत्मा प्रकल्प कार्यालयाकडे वाटपासाठी पाठवले जाते. त्याप्रमाणे नमूद गटात असलेल्या यादीतील शेतकऱ्यांना बियाणे- निविष्टा मोफत वाटप केले जाते. याप्रमाणे यातील तक्रारदार यांनी समृद्धी शेती उत्पादक गट पिंपरान पोस्ट पाटीबेडकी (ता. नवापूर) येथे एकूण १६ शेतकऱ्यांचा गट कायदेशीर स्थापन करून रजिस्टर केला. तक्रारदार हे त्या गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या गटास बियाणे व निविष्टा शासनाकडून मोफत वाटप झालेले आहे .ते शेतात पेरणीदेखील झाले आहे. 

नवापूर येथील आत्मा प्रकल्प कार्यालयातील लोकसेवक योगेश वामनराव भामरे यांनी ७ दिवसांपूर्वी तक्रारदार शेतकरी यांच्याकडे सर्व १६ शेतकरी यांचाकडून प्रत्येकी २५० रूपये प्रमाणे एकूण चार हजार रूपयाची लाचेची मागणी केली होती. ते न दिल्यास पुढील रब्बी हंगामामधील पिकांचे बियाणे मोफत मिळू देणार नाही ,असे सांगितले होते. 

तक्रारदार शेतकऱ्यांने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर तक्रारदार शेतकऱ्याने लोकसेवक भामरे यास आज (ता.१९) पैसे देण्याचे निश्चित केले. त्यात भामरे यांनी तक्रारदार शेतकऱ्यास १६ नव्हे तर ३५ शेतकरी आहेत. प्रत्येकी २ प्र५० रूपये प्रमाणे एकूण ८ हजार ७५० रूपये लाचेची मागणी केली. ती रक्कम पंच व साक्षीदार यांच्या समक्ष करून ती त्यांचा समक्ष नवापूर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया रोड वरील सार्वजनिक रस्त्यावर तक्रारदार शेतकऱ्याकडून स्वीकारतांना भामरे यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याचा विरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने (नाशिक),अप्पर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शिरिष जाधव (नंदुरबार), सापळा प्रमुख पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव,हवलदार उत्तम महाजन,संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दीपक चित्ते ,संदीप नावडेकर,मनोज अहिरे,अमोल मराठे, ज्योती पाटील यांनी केली, 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com