esakal | दिवाळीचा आनंद घरी येण्यापुर्वीच संपला; तीस फुट खोल दरीत कार कोसळली अन्‌ तिघांचा मृत्‍यू
sakal

बोलून बातमी शोधा

car accident

दिवाळीला घरी जायचे आणि परिवारासोबत दिपोत्‍सव साजरा करण्याच्या आनंदात संपुर्ण परिवार गावी येत होता. सकाळी कारने घरून निघाले पण गावी येण्याचा आनंद पुर्णवेळ टिकलाच नाही. अर्धा रस्‍त्‍याचे अंतर कापल्‍यानंतर आनंदाचे क्षण दुःखाच्या खाईत बुडाला. 

दिवाळीचा आनंद घरी येण्यापुर्वीच संपला; तीस फुट खोल दरीत कार कोसळली अन्‌ तिघांचा मृत्‍यू

sakal_logo
By
धनराज माळी

विसरवडी (नंदुरबार) : धुळे- सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला. ट्रकने दिलेल्‍या धडकेत कार तीस फुट खोल दरीत कोसळली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नदीत कार कोसळल्याने झालेल्या अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिक मदतीला धावून आले.

सुरतहून -साक्रीकडे जाणाऱ्या शिप्ट कारला कंटेनरने धडक दिल्याने कार तीस फुट खोल नदीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाले आहे. ही घटना आज दुपारी साडेबारला कोंडाईबारी घाटातील पानबारा गावाजवळ घडली. मृत तिघेही माहीर (ता. साक्री) येथील असून मृतांमध्ये पिता-पुत्री व जावायाचा समावेश आहे. 

मुलीला दिवाळीसाठी गेले होते पिता
याबाबत माहिती अशी माहीर (ता. साक्री ) येथील गोरख सोनू सरक (वय ५६) हे राजकोट (गुजरात) येथे राहणारे मुलगी व जावायास दिवाळीनिमित्त घेण्यासाठी आपली स्वतःची शिफ्ट गाडीने राजकोट येथे गेले होते. आज सकाळी तेथून त्यांना घेऊन गावाकडे निघाले. यावेळी कोंडाईबारी घाटातील पानबारा गावाजवळ कार आली असता तेथील पुलावरून गाडी पुढे जात असतांना समोरून येणाऱया कंटनेरने कारला जोरदार धडक दिली. 

तिघांचा मृत्‍यू
ट्रकच्या धडकेत कार पुलाखाली असलेल्या तीस फुट खोल नदीत कोसळली. त्यात कारचा चक्काचूर होऊन कारमधील गोरख सनू सरक (वय ५६), प्रफुल्ल सुरे वाघमोडे (वय ३५), मनिषा प्रफुल्ल वाघमोडे (वय २४) हे तीन जण जागीच ठार झाले. तर कारमध्ये असलेली निकिता गोरख सरक (वय १५) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यावेळी अपघात होताच कंटेनरचा चालक कंटेनेर तेथेच सोडून पळून गेला. 

चिमुकलीला काढले बाहेर
अपघाताची माहिती मिळताच महमार्ग पोलिस व विसरवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप पाटील व कमर्चारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी निकिता हीला कारमधून बाहेर काढून तत्काळ विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काहीवेळ मृतांची ओळख पटली नाही. त्यानंतर मृतांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांचा नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृतदेह कारमधून काढून रूग्णालयात नेण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे