हुश्‍श...जिल्ह्यातील ९५ अहवाल निगेटिव्ह !

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

जिल्ह्याचे अहवाल धुळे येथे तपासणीसाठी पाठविले जातात, मात्र तेथे ताण वाढल्याने नंदुरबारचे अहवाल उशिरा आले, मात्र त्यातील सर्व ९५ अहवाल निगेटिव्ह आल्याने धोका टळला आहे.

नंदुरबार : कोरोनाच्या आघाडीवर नंदुरबार जिल्ह्यासाठी आज दिलासादायक बातमी आली आहे, ती म्हणजे गेल्या काही दिवासंपासून प्रतीक्षेत असलेल्या स्वॅब तपासणीतील ९५ अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले. ते सर्व निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह संबंधितांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. आज नव्याने तेरा जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. 
 
जिल्ह्याचे अहवाल धुळे येथे तपासणीसाठी पाठविले जातात, मात्र तेथे ताण वाढल्याने नंदुरबारचे अहवाल उशिरा आले, मात्र त्यातील सर्व ९५ अहवाल निगेटिव्ह आल्याने धोका टळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आज आलेले अहवाल हे नंदुरबार आणि आष्टे येथे आढळलेल्या कोरोना रूग्णांच्या संपर्कसाखळीतील तिसऱ्या टप्प्यातील होते. प्रलंबितअहवालात बहुतेक जण श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने स्वतःहून दाखल झालेले आहेत. दरम्यान सायंकाळी आलेल्या अहवालानुसार आजअखेरपर्यत १०१३ जणांचे अहवाल तपासणीस पाठविण्यात आले असून त्यातील ९२४ जणांच अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच एकूण १५ रूग्ण कोरोनामुक्त झालेले असून दोघांचा मृत्यू झालेला आहे. यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या एकूण दोन रूग्णांचे दुसरे अहवालही पॉझिटिव्ह आले असून तीन रूग्णांचे अहवालांचा नेमका निष्कर्ष निघू शकलेला नाही. 

बामखेड्यातून १० स्वॅब घेतले 
शहादा : बामखेडा (ता. शहादा )येथील कोरोनाच्या संसर्ग झालेल्या संबंधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील 27 लोकांना शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यातील दहा व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेतल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली. बामखेडा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. नजीकचे वडाळी आणि काकर्दे हे गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावात चार आरोग्य पथकामार्फत घरोघरी तपासणी करण्यात येत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona Hushsh ... 95 reports in the district are negative!