अबब..रोज पंधरा हजार लीटरचा ऑक्सिजन पुरवठाही पडतोय अपुर्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

सध्या १०० जम्बो सिलेंडर पुरवठा दररोजचा होत आहे. त्यातून काही नियमित रूग्णालयात लागतात. ७५ सिलिंडर कोविड सेंटरला मिळतात. सध्या १२० ऑक्सिजन बेड आहेत. बेडची संख्या लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा कमी आहे. मात्र सध्या रूग्ण संख्येचा दृष्टीने टंचाई म्हणता येणार नाही. 
- डॉ. कांतराव सातपुते, निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी

नंदुरबार : जिल्ह्याला दररोज शंभर ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. ते सर्व सिलिंडर दररोज वापरले जात आहेत. सर्वाधिक ऑक्सिजन कोविड सेंटरमध्ये लागत असून काही प्रमाणात बालरोग व अपघात विभागात वापरले जात आहेत. सध्या होणारा ऑक्सिजन पुरवठा हा तोकडा आहे. कोरोनाचे रूग्ण वाढल्यास ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. असे चित्र सध्याचा पुरवठ्यावरून स्पष्ट आहे. 

नक्‍की वाचा- सिनेस्‍टाईल...जेल तोडण्यासाठी एक कोटीची डील; ठरल्‍याप्रमाणे झालेही पण

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजअखेर चार हजाराचा जवळपास कोरोना रूग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी काही रूग्ण बरे होऊन घरी परतले असले तरी पंचेचाळीशी ओलांडलेल्या रूग्णांमध्ये कोरोना संसर्गाचा परिणाम व त्याची लक्षणे अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांची जोखीम वाढत आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवावे लागते. श्वसनाचा त्रास जाणवत असलेल्‍या रूग्णांना तत्काळ ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. नंदुरबार जिल्हा रूग्णालयात सध्या ५६ रूग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले आहेत. त्यापैकी १८ रूग्ण गंभीर स्थितीत आहेत. 

हेपण पहा- पोटाला चिमटा किती दिवस द्यायचा; या आगीपुढे कोरोनाचा कहर फिकाच
 

तर एका रूग्‍णाला पाच सिलेंडर
रूग्णांची प्रकृती जेवढी गंभीर तेवढ्या अधिक प्रमाणात त्या रूग्णांना ऑक्सिजनवर ठेवावे लागते. त्यामुळे अशा रूग्णांना साधारण दोन तासात एक जम्बो सिलिंडर ऑक्सिजन लागतो. ते संपले की परत दुसरे सिलिंडर सज्ज ठेवावे लागते. त्यामुळे एक जम्बो सिलिंडर साधार १५० लीटरचे येते. तर एका रूग्णाला दिवसभर वेळप्रसंगी पाच सिलेंडरही वापरावा लागतात. जोपर्यंत त्या रूग्णाचा त्रास कमी होत नाही. तोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरूच ठेवावा लागतो. त्यामुळे गंभीर रूग्ण संख्या सध्या कमी असली तरी ऑक्सिजनचा वापर मात्र मोठ्या प्रमाणात होतो. 

दररोज होतोय शंभर सिलिंडरचा पुरवठा 
एक जम्बो सिलिंडरमध्ये साधारण १५० लीटर ऑक्सिजन असतो. म्हणजेच ११० सिलिंडरचा विचार केला व त्याची लीटर क्षमता काढली तर ती १५ हजार लीटर ऑक्सिजनचा पुरवठा सध्या जिल्हा रूग्णालयाला प्रतिदिन होत आहे. लाईफ लाईन या संस्थेतर्फे नंदुरबार जिल्हा रूग्णालयाला हे शंभर सिलिंडर पुरविले जात आहेत. त्यात साधारण २० ते २५ सिलिंडर म्हणजे तीन हजार लीटर लीटर ऑक्सिजन हा रूग्णालयात इतर विभागाचे साधारण रूग्णांना आवश्यक असतात. त्यात बालरोग विभाग , प्रसूती विभाग, अपघात विभागात गंभीर रूग्णांना ऑक्सिजन लागतो. उर्वरित ७५ सिलिंडर हे कोविड सेंटरला मिळत आहेत.जिल्ह्यातील कोविड चे गंभीर रूग्ण येथील जिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटरला दाखल केले जातात. त्यामुळे या सेंटरलाच ऑक्सिजन पुरवठा केला जातो. त्याही व्यतिरिक्त शहरात दोन कोविड सेंटर आहेत. तेथे ऑक्सिजन लागतो. त्यामानाने विचार केल्यास सध्या रूग्ण संख्येचा तुलनेत होत असलेला ऑक्सिजन पुरवठा तोकडाच मानावा लागेल. मात्र रूग्ण संख्या वाढल्यास ऑक्सिजनच्या टंचाईला सामोरे जाण्याची वेळ जिल्हा रूग्णालयावर येऊ शकते. 
 
कोविड रूग्ण -३८०० 
उपचार घेणारे-११४० 
ऑक्सिजनवर -५६ 
प्रकृती चिंताजनक-१८ 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar daily fifteen thousand litter oxygen cylinder