पीककर्जात राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवर 

बळवंत बोरसे
Thursday, 25 June 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावूनही आजमितीस या बॅंकांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ बारा टक्केच कर्जवाटप केलेले आहे. त्यापेक्षा जास्त ग्रामीण बॅंकांनी चौदा टक्के तर खासगी बॅंकांनी पंधरा टक्के कर्जवाटप केले आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी पीककर्ज वाटपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी देऊनही राष्ट्रीयकृत बँकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. सुरवातीला दहा जूनपर्यत पन्नास टक्के, नंतर किमान सत्तर टक्के कर्जवाटप करा असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावूनही आजमितीस या बॅंकांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ बारा टक्केच कर्जवाटप केलेले आहे. त्यापेक्षा जास्त ग्रामीण बॅंकांनी चौदा टक्के तर खासगी बॅंकांनी पंधरा टक्के कर्जवाटप केले आहे. दुसरीकडे धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मात्र सर्वाधिक ६९ टक्के कर्जवाटप करीत आघाडी घेतली आहे. शिवाय महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या लाभासाठीही जिल्हा बॅंकेने शिखर बॅंकेची मदत घेत प्रयत्न सुरू केले आहेत. 

जिल्ह्यात यंदा गतवर्षीचा जेमतेम हंगाम आणि नंतर कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सेतकऱ्यांना असलेला मालही विकता आला नाही. कर्ज फेडता आलेले नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेलाही आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाने बॅंकर्स समितीची बैठक घेत लिड बॅंकेसह सर्वांनाच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जवाटप करावे असे आवाहन वेळोवेळी गेतलेल्या बैठकीत केले आहे. मात्र जिल्हा बॅंक वगळता राष्ट्रीयकृत बँकांनी प्रशासनाचे हे आवाहन दुर्लक्षित केल्यासारखी स्थिती आहे. शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या मेळाव्यांतही केवळ पावणेदहा कोटींची कर्ज मंजूर होते, यावरून राष्ट्रीयकृत बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नाखूष आहेत किंवा त्यांना फारसे देणेघेणे नाही हाच मुद्दा चर्चिला जात आहे. 
 
बॅंकांच्या वागणुकीची दखल का नाही ? 
सुरवातीला कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांना खरीपासाठी कर्ज मिळू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र यामुळे बॅंका शेतकऱ्यांना दारातही येऊ देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कर्जप्रकरणासाठी लागणारी माहिती, कागदपत्रे देऊनही कर्ज देत आहोत, म्हणजे जणू काही आम्ही उपकारच करतो आहोत अशा पद्धतीने शेतकऱ्यांना बँकेत वागणूक मिळत असल्याने शेतकरी नाउमेद होत आहे. या बॅंकांना प्रशासन नुसते कागदोपत्री आदेश करीत आहे, त्यांचे प्रत्यक्ष कामकाज का पुढे जात नाही. दरवर्षी या बॅंका अशाच पद्धतीने वागत असूनही जिल्हाधिकारी त्याची गांभिर्याने दखल का घेत नाही असा प्रश्‍न सामान्य शेतकरी विचारत आहेत. 

बॅंकाना दिलेले २०२०-२१ चे उद्दिष्ट (आकडे लाखांत) 

बॅंक- खरिप-रब्बी उद्दिष्ट- प्रत्यक्ष कर्जवाटप- टक्के 
जिल्हा बॅंक ः७५९४.००-४१६२.८५- ६९ 
राष्ट्रीयकृत बॅंका-५७१६२.००-५३७९.००-१२ 
ग्रामीण बॅंक ः१३३१.००-१८५.००- १४ 
खासगी बॅंकाः ८४६२.००- १२८७.००-१५ 

कर्जमेळाव्यात झालेले वाटप असे 
बॅंक आॅफ बडोदा ः ३ कोटी ५५ 
बॅंक आॅफ इंडिया ः१३ लाख 
बॅंक आॅफ महाराष्ट ः १ कोटी १९ लाख 
कॅनरा बॅंक ः १३ लाख 
सेंट’ले बॅंक आॅफ इंडिया ः २ कोटी २० लाख. 
युनियन बॅंक आॅफ इंडिया ः १ कोटी ०९ 
स्टेट बॅंक आॅफ इंडिया ः६४ लाख. 
महा. ग्रामीण बॅंक ः ३५ लाख 
पंजाब नॅशनल बॅंक ः१० लाख. 
आयडीबीआय बॅंक ः७ लाख. 
(ॲक्सिस बॅंक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बॅंकेने अद्याप एकालाही कर्ज दिलेले नाही) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar farmer loan On the back national bank