ग्रामपंचायत, सफाई कर्मचाऱ्यांच्‍या श्रमदानातून साकारला वनराई बंधारा ! 

दगाजी देवरे  
Thursday, 29 October 2020

गेल्या वर्षापासून पावसाने सातत्य ठेवल्याने यंदा वनक्षेत्रातील प्रत्येक नाला खळखळून वाहत आहे. वनराई बंधाऱ्यामुळे वाहणारे पाणी एकाच ठिकाणी जिरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

म्हसदी : ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’, या उक्तीप्रमाणे येथील ग्रामपंचायत कर्मचारी व सफाई कामगारांनी योगदान देत एकजुटीचे बळ काय असते ते दाखवून दिले. दिवसभराच्या श्रमदानातून येथील गुलबल्या नाल्यावर वनराई बंधारा साकारला. प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी ‘पाणी आडवा- पाणी जिरवा’ या उपक्रमाची सुरवात केली. पाणी साठवून लोकांना अधिक फायदा व्हावा, यासाठी विविध उपाययोजनांबरोबरच शेतीसाठी वनराई बंधारा साकारण्याच्या कामात त्यांनी लक्ष घातले. 

वाचा- गॅस सिलेंडर वाटणीच्या वादातून पुतण्याने काकांचा केला खून 
 

चौफेर पाणीच पाणी 
यंदा दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी असले, तरी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांनी वनराई बंधारे साकारण्यात सहभागी व्हा, असे आदेश दिले. गेल्या वर्षीही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी याच ठिकाणी वनराई बंधारा साकारला होता. प्रशासक ए. पी. महाले व तत्पर ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लिपिक रवींद्र देवरे, कर्मचारी प्रकाश खैरनार, विजय देवरे, भूषण चव्हाण, सिद्धार्थ मोहिते, सचिन मोहिते, समाधान देवरे, प्रवीण देवरे, काशीनाथ अहिरे, सतीश देवरे, विशाल चव्हाण, रितेश वाघ, दीपक सापोळे, किरण सावळे आदींनी श्रमदान केले. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू भरत वाहून जाणारे पाणी अडविले आहे. गेल्या वर्षापासून पावसाने सातत्य ठेवल्याने यंदा वनक्षेत्रातील प्रत्येक नाला खळखळून वाहत आहे. वनराई बंधाऱ्यामुळे वाहणारे पाणी एकाच ठिकाणी जिरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून जलस्तर उंचावला जाईल, असा विश्वास परिसरातील शेतकऱ्यांना आहे. 

आवश्य वाचा- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पीडित कुटुंबाला जगण्याचे बळ देतेय ‘उभारी’योजना 
 

अजून बंधारे तयार करणार 
पर्यावरणसंवर्धन, तसेच भूजल पातळी चांगली राहावी, यासाठी कर्मचारी उपाययोजना करीत असतात. प्रशासक व अनुभवी ग्रामस्थांच्या सहकार्याने अजून वनराई बंधारे बांधण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी बोरसे यांनी दिली.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar gram panchayat, sweepers vanrai dam bild through the hard work