गुजरातमधून अठराशे मजूर जिल्ह्यात परतले 

गुजरातमधून अठराशे मजूर जिल्ह्यात परतले 

तळोदा  : गुजरातमधील मढी येथे ऊसतोडणीसाठी गेलेल्या अतिदुर्गम तोरणमाळ परिसरातील ७८७ आणि मजुरीसाठी गेलेले हजारावर ऊसतोडणी आज जिल्ह्यात परतले. यातील काही मजूर वाका चाररस्तामार्गे तर काही आंबाबारी (ता. अक्कलकुवा) येथील सीमेकडून आले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, आमदार राजेश पाडवी यांनी घटनास्थळी जात मजुरांची भेट घेतली. या मजुरांची स्क्रिनिंग करण्यात आली,त्यांना होमक्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. विशेष म्हणजे या मजुरांना पाठविण्यात येत असल्याबाबत कुठल्याही सूचना गुजरात सरकारने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या नव्हत्या. 

हे मजूर व्यावल व वाका चार रस्ता या जिल्ह्यानजीकच्या गुजरात हद्दीत खासगी वाहनाने पहाटे चारला पोहोचले. तेथे या मजुरांना सकाळी अकरापर्यंत थांबावे लागले. अखेर या मजुरांना आमलाड येथील विलगीकरण कक्षात आणून त्यांची तपासणी करण्यात आली. नंतर त्या सर्वांना घरीच विलगीकरण राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सर्व मजुरांना आमदार राजेश पाडवी यांनी वाहनाने तोरणमाळ येथे सोडण्याची व्यवस्था केली. 

तोरणमाळ परिसरातील कुंडीपाडा, सिंदीदिगर, झापी, फलाई, खडकी, कुंड्या, भादल, नवे तोरणमाळ, जुने तोरणमाळ या गावातील मजूर मढी (जि.तापी) येथील साखर कारखान्यावर ऊस तोडण्यासाठी गेले होते. हे मजूर जिल्ह्यात १४ टेम्पो व ट्रक या वाहनांनी परत येत होते. वाका चाररस्ता येथे पोहोचल्यावर प्रकाशानजीक सीमेवर त्यांना अडवण्यात आले. हे मजूर परतत आहेत याप्रकारची कोणतीही सूचना कारखानदार अथवा तापी जिल्हा प्रशासनाने नंदुरबार जिल्हा प्रशासनाला कळवली नव्हती. त्यामुळे तोरणमाळचे माजी सरपंच सीताराम नूरला पावरा यांच्यासह हे मजूर आमलाड येथे पोहोचले.

 
आमलाड विलगीकरण कक्षात त्यांची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, डॉ. विशाल चौधरी यांच्या पथकाने तपासणी केली. या मजुरांना कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. विलगीकरण कक्षात आमदार राजेश पाडवी यांच्याकडून चहा बिस्किटे देण्यात आली. मजुरांमध्ये महिला व लहान बालकांचा समावेश होता. 

गुजरात सरकारची बेपर्वाई 
जिल्ह्यातील मजुरांना गुजरातमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा व्हावा व मजुरांना परत पाठविण्यासंदर्भात सहकार्य करण्यासबंधी पत्र गुजरातचे मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड के सी पाडवी यांनी पाठवले होते. त्यामुळे गुजरात तापी जिल्हा प्रशासनाने नियोजन करून हे मजूर परतत आहेत अशी माहिती नंदुरबार जिल्हा प्रशासनाला द्यायला हवी होती. मात्र त्यांनी ही माहिती पाठवली नाही. 

आंबाबारी येथे हजारावर मजूर 
वाण्याविहीर : गुजरातमधून मजुरीसाठी गेलेले हजारावर मजूर शेकडो किलोमीटर पायी चालून अंबाबारी येथे आज पोहचले. गेल्या दोन दिवसापासून ते उपाशी असल्याने पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या सूचनेनुसार खापरचे माजी उपसरपंच ललित जाट यांनी जेवणाची सोय केली. या मजुरांबाबत माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड़, आमदार राजेश पाडवी, उपविभागीय अधिकारी अविशांत पंडा, उपविभागीय पोलिस अधिकारी कदम, तहसीलदार कछवे आदींनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. आमदार पाडवी यांनी सर्वांना घरी पोहचवण्यासाठी वाहनांची सोय केली. खापर येथील लक्ष्मण वाडिले, अक्षय सोनार, नरेंद्र चौधरी, संजय चौधरी, श्याम लोहार, भाउसिंग वसावे यांनी देखील मदत केली. 

‘सकाळ'ने मांडली होती व्यथा 
शहादा ः शहादा तालुक्यातून गुजरातमध्ये गेलेल्या मजुरांची व्यथा सर्वप्रथम ‘सकाळ'ने मांडली होती. यातील काही मजूर आज सामळदा येथील सीमेवर दाखल झाले. या सर्वांचे स्क्रिनींग केल्यानंतर क्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतरच जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला. लॉकडाऊनमुळे त्यांना परतणे शक्य झाले नव्हते. सकाळच्या वृत्तानंतर पालकमंत्री ऍड पाडवी यांनी गुजरात सरकारला पत्र लिहिले होते. 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com