सुरत महामार्गाचे अपूर्ण चौपदरीकरण अपघातांना कारणीभूत 

दिलीप गावीत
Thursday, 22 October 2020

ग्रामस्थ, पोलिसांनी आणि या मार्गावरील अनेक वाहनधारकांनी आपल्या परीने या प्रवाशांना मरणाचा दाढेतून काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असताना, प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. 

विसरवाडी ः धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण अपूर्ण अवस्थेत आहे. त्यात अरुंद पूल, तारेवरची कसरत करीत दोन वाहने जेमतेम निघू शकतात, अशी परिस्थिती या रस्त्यावर आहे. पावसाळ्यात खड्डे पडले आहेत. ते अद्याप बुजविलेले नाहीत. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात लहान- मोठे अपघात वारंवार घडत आहेत. बुधवारी घडलेला भीषण अपघाताला चालक जबाबदार आहेच. मात्र, रस्‍त्‍याच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करणारे प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे. 

आवश्य वाचा- मुलाचे लग्न झाल्याने घरात होते आनंदाचे वातावरण; आणि क्षणातच वडिलांच्या अपघाताची आली बातमी  

बुधवारी कोंडाईबारी घाटात झालेला अपघात म्हणजे ४० लोकांचा जीवन मरणाचा खेळच झाला. अपघातात पाच जण जागीच ठार झाले. ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री अंधारात आक्रोश, वाचविण्यासाठी प्रत्येकाच्या आरोळ्या, ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती हृदय हेलावणारी आहे. ग्रामस्थ, पोलिसांनी आणि या मार्गावरील अनेक वाहनधारकांनी आपल्या परीने या प्रवाशांना मरणाचा दाढेतून काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असताना, प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. 
रस्त्यांवरील हॉटेलांमध्ये दारू व्यवसाय जोरात सुरू आहे. त्यामुळे काही वाहनचालक दारूचा पेग मारून वाहन चालवतात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या घटनेला कारणीभूत चौपदरीकरणाचे अपूर्ण काम, पावसामुळे रस्त्यावर पडलेली मोठमोठी खड्डे व हॉटेल व्यावसायिकांची मद्य विक्री अपघातास कारणीभूत ठरत आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हलमध्ये दारूची बाटली आढळून आली. 

रस्त्याचे काम अपूर्ण 
राष्ट्रीय महामार्गाचे काम एका नामांकित कंपनीला दिले आहे. मात्र, कंपनी दिवाळखोरीत गेल्याने हा रस्ता अर्धवट आहे. त्यात पुलाचे कामही अपूर्ण आहे. एकमेकांना पूल न जोडल्यामुळे जेमतेम दोन वाहने निघतात. पुलापर्यंत येणारा रस्ता चार वाहने निघतील, असा असल्याने भरधाव वेगाने येणारे वाहनचालकास पुलाच्या ठिकाणी एकदम रस्ता अरुंद दिसतो. त्यामुळे चालक अचानक ब्रेक मारून वेग कमी करतो. अथवा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होतात.  

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Incomplete four-laning of Surat highway causes accidents