बापरे ! नंदुरबार शहरात बिबट्याचा संचार, शेतात दिला चार पिलांना जन्म

निलेश पाटील
Monday, 5 October 2020

बिबट्याच्या मादीने या शेतात पिलांना जन्म दिला त्याअर्थी बिबट्या नर आणि मादीचा नंदुरबार शहर परिसरालगतच वावर असावा हे आता उघड झाले आहे.

शनिमांडळ :नंदुरबार शहरालगतच्या शेतात वाघिणीने बस्तान मांडले असून तिथे चार पिलांना जन्म दिला असल्याचे आज रविवार रोजी आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

आवश्य वाचा- कापूस खरेदी करतांना मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱयांनी बदडले !  

दूर जंगलात नव्हे तर नंदुरबार शहरातील बायपास ऊड्डाणपूलाखालील उमर्दे रस्त्यावर कृषी विद्यालया मागील शेतात बिबट्याच्या मादीने चार पिलांना जन्म दिला आहे. शेखर मराठे यांच्या मालकीच्या शेतात काम करणाऱ्या मजुराला झुडपांमध्ये आज रविवार रोजी दुपारी ही पिले आढळली तेव्हा ही बाब उघड झाली. त्यांनी लगेचच शेखर मराठे यांना ही माहिती दिली. शेखर मराठे यांनी वन विभागाशी संपर्क करीत आरएफओ रघुवंशी यांना पाचारण केले. रघुवंशी यांनी रात्री शेतात भेट देऊन पिलांची सुरक्षितता ठेवण्याविषयीच्या सूचना दिल्या.

 

नर मादीचा शहरालगत वावर

ज्या अर्थी बिबट्याच्या मादीने या शेतात पिलांना जन्म दिला त्याअर्थी बिबट्या नर आणि मादीचा नंदुरबार शहर परिसरालगतच वावर असावा हे आता उघड झाले आहे. याच्या आधी काही महिन्यांपूर्वी नंदुरबारच्या पूर्व दिशेला शहरापासून दहा किमी अंतरावरील वावद शिवारात दोनदा बिबट्याने दर्शन दिले होते. नंतर ऊत्तरेला ठाणेपाडा परिसरात आढळला होता. अलीकडेच नंदुरबारपासून दक्षिणेला हातोडा पुलाच्या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन झाले आणि आता थेट शहरातील उड्डाणपुलाजवळ पिले देण्याचीी घटना घडली आहे.

आवर्जून वाचा-  साडेआठ कोटी रुपये खर्च  करून पाण्याची टाकी बांधली, पाणी भरताच ती लागली गळायला ! 
 

तापी परिसरात रहिवास 

नंदुरबार पासून 20 - 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोदा शहरात तर वरच्यावर उघडपणे बिबट्याचा मुक्तसंचार दिसू लागला आहे. शहादा, तळोदा व नंदुरबार या तीन तालुक्यांना जोडणारा तापी परिसर बिबट्यांच्या मुक्त संचाराचा व रहिवासाचा भाग बनला असल्याचे यावरून निर्देशीत होत आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar leopard gave birth to four calves in a field near Nandurbar city.