देहावर डोकं टेकनंही नशीबी नाही...आई तुला शोधू कुठे गं...व्हिडीओकॉलवर आर्त हाक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

ज्या आईने जन्म दिला. तिचे बोट धरुन चालायला शिकलो. लहानाचे मोठे झाले, लग्न झालीत. आता तीच आई ईहलोकाचा प्रवासाला निघालेली असतांना लॉकडाऊनमुळे तिचे अंतिम दर्शन सुद्धा घेता न आल्याने मोठा दुखाचा डोंगरच त्यांच्यावर मुलींवर कोसळला.

नंदुरबार : आईचे दु:खद निधन झाल्याने तिचा मृतदेहाजवळ बसून ढसढसा रडून घ्यावं. आईला शेवटची हाक तरी मारावी. एकदा तरी तिचा देहावर डोकं टेकावं, या आशेने व्याकूळ झालेल्या तिन्ही मुलींना आईचा अंत्यदर्शनाची इच्छा असतांनाही लॉकडाऊनमुळे बाहेर गावाहून येणे शक्‍य झाले नाही. अखेर व्हाट्‌सऍप कॉलिंगचा माध्यमातून मुलींनी आईचे अंतिम दर्शन घेतले. मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करीत व येथील वृद्ध महिलेचा अंत्यविधी पार पडला. 

नक्‍की पहा - नंदुरबार होतेय हॉटस्पॉट...आणखी तिघे पॉझिटिव्ह 

शहरातील धुळे बायपासपासून कोकणीहिल रस्त्यावर असलेल्या लक्ष्मीनारायण नगरमधील रहिवासी व खादी ग्रामोद्योग संघात गेल्या वर्षभरापासून कार्यरत असलेले योगेश शंकर बदान यांच्या आई विजया शंकर बदान (वय 55) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दोन दिवसापूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.औषधोपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्यानंतर काल (ता.19) पहाटे अधिक त्रास जाणवल्याने मुलगा योगेश यांनी तत्काळ रुग्णालयात संपर्क साधून रुग्णवाहिका मागवून पुन्हा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय पथक व परिचारिकांनी अगदी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर उपचारादरम्यान विजया बदान यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. 

व्हिडिओ कॉलिंगद्वारे मुलींनी घेतले दर्शन 
ज्या आईने जन्म दिला. तिचे बोट धरुन चालायला शिकलो. लहानाचे मोठे झाले, लग्न झालीत. आता तीच आई ईहलोकाचा प्रवासाला निघालेली असतांना लॉकडाऊनमुळे तिचे अंतिम दर्शन सुद्धा घेता न आल्याने मोठा दुखाचा डोंगरच त्यांच्यावर मुलींवर कोसळला. अखेर भाऊ योगेश यांनी सोशल मिडीया व्हाट्‌सऍपच्या माध्यमातून तिन्ही बहिणींना व्हिडीओ कॉलिंग करुन आईचे अंतिम दर्शन करुन दिले. 

लॉकडाऊनचा असाही फटका 
मयत वृद्धा विजया बदान यांना गेल्या चार ते पाच वर्षापासून दम्याचा त्रास होता. मुलगा योगेश आईच्या तब्येतीची नेहमी काळजी घेत असत. शहरातील लक्ष्मीनारायण नगर कॉलनीत महिनाभरापूर्वीच भाडेकरु म्हणून राहायला आले होते. दम्याचा त्रासात उष्णता सहन होत नसल्याने आईसाठी मुलाग योगेश कुलर आणणार होते. परंतू लॉकडाऊनमुळे इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकाने बंद असल्यामुळे शक्‍य झाले नाही. एकंदरीत लॉकडाऊनचा असाही फटका त्यांना सहन करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar mother death video colling last funeral girl