जिल्ह्यात रोहयोची वर्षभर पुरतील एवढी कामे : जिल्हा परिषद मुकाअ विनय गौडा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम पंचायत यंत्रणा त्याचप्रमाणे राज्य शासनाचा वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, लघुपाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत विविध कामांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो.

नंदुरबार  : जिल्ह्यातील मजुरांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वर्षभर पुरतील एवढी कामे मंजूर असून, मजुरांनी गावातच रोजगार उपलब्ध करून घ्यावा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कामांवर जाताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांनी केले आहे. 

 आर्वजून पहा : "त्या'... कोरोना पॉझिटिव्ह ट्रकचालकामुळे जिल्हावासीयांना टेंशन 
 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्याने सर्वत्र रोजगाराची वानवा आहे, अनेक स्थलांतरित मजूर आपापल्या गावात परतले आहेत, अशा सर्व ग्रामीण कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या कामांबाबत माहिती देताना नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मजुरांना आपल्या गावातच काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम पंचायत यंत्रणा त्याचप्रमाणे राज्य शासनाचा वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, लघुपाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत विविध कामांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो.

 

मजुरांनी केलेल्या कामाचा मोबदला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ३ लाख ५ हजार ४७७ एवढे जॉब कार्ड वितरित करण्यात आले असून, त्यापैकी एक लाख ३२ हजार १४५ जॉबकार्ड कार्यान्वित आहेत. जिल्ह्यात एक लाख २६ हजार ३३२ जॉब कार्ड पडताळणी करण्यात आलेले असून, त्याअंतर्गत दोन लाख २३ हजार ४६२ मजूर कार्यान्वित आहेत. आजच्या परिस्थितीत एकट्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, सिंचन विहीर, शौचालय, शोषखड्डे, गुरांचा गोठा अशी कामे प्रस्तावित असून, सार्वजनिक कामांमध्ये रस्ते, पाझर तलाव गाळ काढणे, अंगणवाडी इमारत बांधकाम, पिण्याच्या पाण्याची विहीर, लहान नाल्यांवर जाळी बंधारे (गॅबीअन स्ट्रक्चर), मातीनाला बांध बांधकाम व दुरुस्ती अशी कामे प्रस्तावित आहेत. 

 

क्‍लिक कराः कोरोनाच्या "सायलेंट कॅरिअर'चा धोका ओळखा 
 

सन २०१९ - २० च्या प्रस्तावित कामांपैकी २८ हजार ८६६ कामे अपूर्ण आहेत, त्यातून १६ लाख ८४ हजार १३२ मनुष्य दिवस एवढे काम उपलब्ध आहे. तर इतर २३ हजार २२० कामे नव्याने मंजूर आहेत व त्यातून १६ लाख २२ हजार ६८० मनुष्य दिवस एवढे काम उपलब्ध आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर १२४६ सार्वजनिक कामे मंजूर करण्यात आली असून, त्यातून ९ लाख ५० हजार ४६९ मनुष्य दिवस एवढे काम उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे या सर्व ३ हजार ३३२ कामांमधून ४२ लक्ष ५७ हजार ३११ मनुष्य दिवस एवढी कामे उपलब्ध आहेत. २०२०-२१ या वर्षासाठी ३० लाख १४ हजार ५१७ मनुष्य दिवस एवढे काम उपलब्ध करून देण्याचे लक्ष देण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यात आजच दिलेल्या लक्षांकापेक्षा अधिकची कामे उपलब्ध आहेत व इतर अनेक कामे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील मजुरांसाठी उपलब्ध कामांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, मागेल त्याला काम या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धोरणानुसार जिल्ह्यातील मजुरांना वर्षभर पुरतील एवढी कामे उपलब्ध असून. नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर असलेली आपली घरकुले पूर्ण करून घ्यावीत व रोजगार हमी योजनेच्या कामाचे ई-मस्टर प्राप्त करून घ्यावेत. त्याचबरोबर प्रत्येक गावात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक कामांबाबत ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध करून घ्यावा, अशा कामांवर जाताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. घराबाहेर 
पडताना तोंडाला रुमाल बांधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी केले आहे. 

नक्की वाचा : लॉकडाउन'ने सिझन खाल्ला; आता ऑनलाइन शॉपिंगनंतर हवी परवानगी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar This is Rohio's year-long work in the district Zilla Parishad