एसटी चालक बस चालवत गेला अन थुंकत गेला, मग काय झालेना निलबंन ! 

धनराज माळी
Friday, 4 September 2020

तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून केबिनमध्येच थुंकत असल्याचे चित्रीकरण बसमधील एका जागरूक प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केले.

नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातील एसटी चालकास धावत्या बसमध्ये केबिनच्या आत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून थुंकणे भोवले. चालकाच्या निष्काळजीपणाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एसटीची प्रतिमा मलिन झाली. या घटनेची तत्काळ दखल घेत धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्या आदेशान्वये बसचालकास निलंबित करण्यात आले. 

हे ही वाचा : पोलिसाची करामत, ब्रेक फेल ट्रक चालवायला लावला आणि स्तंभावर निभावला   
 

नंदुरबार आगारातील बसचालक दिलीप भामरे (बिल्ला क्रमांक १८७७) यांना नंदुरबार आगारातून नंदुरबार-नाशिक मुक्कामाची कामगिरी दिली होती. २ सप्टेंबरला नाशिकहून नंदुरबारकडे येत असताना, त्यांच्या ताब्यातील बस (एमएच २०, बीएल ४०२५) चालक भामरे चालवीत असताना तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून केबिनमध्येच थुंकत असल्याचे चित्रीकरण बसमधील एका जागरूक प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केले.

 

अन व्हिडीओ झाला  व्हायरल

काही वेळातच एसटी चालकाचे हे कृत्य प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाले. यामुळे राज्य परिवहन मंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली. सध्या कोरोना महामारीमुळे शासनाकडून विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना असतानाही नंदुरबार आगारातील चालक दिलीप भामरे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग करून प्रवाशांच्या आरोग्याची खबरदारी न घेता आणि वाहन चालविताना तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून चालक आसनाजवळच थुंकण्याचा प्रताप केला.

एसटीची प्रतिमा केली मलिन

प्रवाशांसह राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तब्बल सहा महिन्यांपासून एसटी बंद होती. यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, मिशन बिगिनअंतर्गत ठराविक प्रवाशांच्या मर्यादेनुसार पुन्हा लालपरी सुरू झाली. व्‍यसनाधीन चालकामुळे एसटीची प्रसारमाध्यमांमध्ये प्रतिमा मलिन झाल्याने कारवाई करण्यात आली. 

आवश्य वाचा : विहिर, कुपनलिका तुडुंब तरी कांद्यासाठी शेतकर्‍यांना का करावा लागतो रात्रीचा दिवस  
 

कोरोनाच्या भीतीने प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद नसतानाही राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरक्षित आणि सॅनिटाइझ केलेल्या बस प्रवासासाठी देण्यात येत आहेत. महामंडळाचे उत्पन्नवाढीसाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत असताना, बस केबिनमध्ये थुंकून कोरोना प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे सत्र सुरूच राहील. 
-मनीषा सपकाळ, विभागीय नियंत्रक, धुळे विभाग  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar ST bus driver was suspended for spitting in the bus