हजारो सिकलसेल रुग्णांचा जीव टांगणीला...गोळ्या पुण्यात अडकून

दिनेश पवार  
Wednesday, 22 April 2020

वेळेवर गोळ्या उपलब्ध होत नसल्याने सिकलसेलच्या रूग्णांचे हाल होत आहेत. काही रुग्णांना गोळ्यांअभावी जिवावं बेतू शकते. जिल्हा प्रशासनाने संबंधित एनजीओशी तात्काळ संपर्क साधून पुणे येथून गोळ्या आणण्यासाठी सोय करून द्यावी,अशी मागणी या हजारो सिकलसेल रुग्णांकडून व त्यांच्या परिवाराकडून केली जात आहे. 

मंदाणे : कोरोनामुळे सर्वदूर लॉकडाऊन असल्याने अनेक घटकांना त्याचा फटका बसत आहे. असाच फटका जिल्ह्यातील सिकलसेलच्या रूग्णांना बसला आहे. या रुग्णाला वाचवण्यासाठी महत्वाच्या गोळ्ंयांचा पुरवठा महिन्याभरापासून होऊ शकलेला नाही. या गोळ्यात पुण्यात अडकल्याने हजारो रुग्णांचा जीव टांगणीवर आला आहे. गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या एनजीओंना यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. 

आर्वजून पहा :"कोरोना' लढ्यात आता शिक्षकांची मदत घेणार; काय आहे "कोविड गार्ड...
 

नंदुरबार शंभर टक्के आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात सिकलसेल आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही वर्षांपासून प्रशासन पुणे-हडपसर येथील एका"महाराष्ट्र आरोग्य मंडळ"नामक एनजीओच्या मदतीने जिल्ह्यातील हजारो रुग्णांवर उपचार करत आहेत. दर महिन्याला लागणाऱ्या गोळ्या-औषधींचा पुरवठा देखील ही एनजीओ या रुग्णांना वेळेवर करून देत आहे. 

गेल्या महिनाभरापासून असाच गोळ्यांचा साठा या एनजीओकडून पुणे येथील साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन असल्याने कुरिअर तथा इतर वाहतूक सेवा बंद पडल्याने या गोळ्या पुणे येथेच अडकून पडल्या आहेत. वेळेवर गोळ्या उपलब्ध होत नसल्याने सिकलसेलच्या रूग्णांचे हाल होत आहेत. काही रुग्णांना गोळ्यांअभावी जिवावं बेतू शकते. जिल्हा प्रशासनाने संबंधित एनजीओशी तात्काळ संपर्क साधून पुणे येथून गोळ्या आणण्यासाठी सोय करून द्यावी,अशी मागणी या हजारो सिकलसेल रुग्णांकडून व त्यांच्या परिवाराकडून केली जात आहे. 

नक्की वाचा :"लॉकडाउन'मध्ये मद्य तस्करी...दुकानानंतर गुदामाचा परवानाही रद्द ! 
 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये सिकसेल रुग्ण आहेत. यापैकी धडगांव तालुक्यात याचे प्रमाण जास्त आहे. या जिल्ह्यातील सर्वच रुग्णांना दर महिन्याला वेळेवर आवश्यकतेनुसार गोळ्या-औषधे पुरविली जातात. लॉकडाऊनमुळे त्या गोळ्या पुण्याहून न आल्याने रुग्णांना त्रास जाणवू लागला आहे. 
- गंगाराम ठाकरे, सरपंच, तितरी, ता.शहादा. 

जिल्ह्यातील सुमारे साडे चार हजार सिकलसेल रुग्णांसाठी रोषमाळ (ता.धडगांव) येथे आमच्या एनजीओकडून दवाखाना सुरु केला आहे. तेथे रुग्णांवर उपचार करून गोळ्या-औषधे दिली जातात. कोरोनामुळे रुग्णांसाठी तयार गोळ्या पुणे येथेच अडकून पडल्या आहेत. प्रशासनाने या गोळ्या पुण्याहून धडगांव आणण्यासाठी परवानगी द्यावी अशी अपेक्षा आहे. 
-डॉ. सुदाम काटे (एनजीओ, पुणे), मुख्य व्यवस्थापक, सिकलसेल दवाखाना, रोषमाळ. 

क्‍लिक कराः आपत्कालीन स्थितीत ते राबतात..मात्र "मनपा'ने त्यांचे वेतन थकवले 

वाहनाची व्यवस्था करू ः डॉ. भोये 
सिकलसेल रूग्णांच्या गोळ्यांच्या अडचणीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांच्याशी सकाळने संपर्क साधला असता त्यांनी आपण या गोळ्या आणण्याची व्यवस्था करत असून गुरूवारी त्यासाठी वाहन पुणे येथे पाठविले जाईल. परवापर्यत या गोळ्या आणण्यात येतील असे सांगितले. त्यानंतर वाटपाला सुरवात होईल असे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Thousands of sickle cell patients were hanged