आपत्कालीन स्थितीत ते राबतात..मात्र "मनपा'ने त्यांचे वेतन थकवले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

राष्ट्रीय आपत्ती असल्याने या कर्मचाऱ्यांकडून गेल्या महिनाभरापासून कुठलीही सुटी न देता कामे करवून घेतली जात आहेत. अगदी चोवीस तास सातही दिवस "मनपा'चे शंभर ते दीडशे कर्मचारी कामावर आहेत.

जळगावः "कोरोना'चा प्रादुर्भा पाहता जिल्ह्यात सर्वत्र "लॉकडाउन'ची स्थिती आहे. गेल्या महिनाभरापासून शहरात कर्फ्यूसदृश परिस्थिती आहे. अशा आपत्कालीन स्थितीतही महापालिकेचा आरोग्य विभाग गेल्या महिनाभरापासून कुठलही सुटी न घेता 24 तास कर्तव्यावर हजर आहे. अतिरिक्त कामे या कर्मचाऱ्यांकडून करवून घेतली जात असताना 20 तारीख उलटूनही या कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर आता आर्थिक संकट ओढवले आहे. 

नक्की वाचा :  जळगावात आणखी दोन कोरोना पॉझिटीव्ह 
 

जळगाव महापालिकेच्या आस्थापनेवर तीन हजार कर्मचारी आणि अधिकारी वेगळे आहेत. गेल्या 20 मार्चपासून "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन'ची अवस्था आहे. "लॉकडाउन' काळात मनपा आस्थापनेवरील बांधकाम, नगररचना, लेखा आदी विभागांतील कर्मचारी कार्यालय बंद असल्याने सुटी उपभोगत आहेत. अतिक्रमण निर्मूलनसारख्या काही विभागांचे कर्मचारी तास-दोन तासांच्या ड्युटीनंतर सुटीच भोगत आहेत. केवळ आरोग्य, वैद्यकीय आणि अत्यावश्‍यक सेवेतील (अग्निशामक दल) कर्मचारी आजमितीस कामावर आहेत. राष्ट्रीय आपत्ती असल्याने या कर्मचाऱ्यांकडून गेल्या महिनाभरापासून कुठलीही सुटी न देता कामे करवून घेतली जात आहेत. अगदी चोवीस तास सातही दिवस "मनपा'चे शंभर ते दीडशे कर्मचारी कामावर आहेत. कामातून मुक्तता नाहीच मात्र महिन्याची 21 तारीख उलटल्यावरही या कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. 

आर्वजून पहा :  कोरोना संशयीत तरुणीने स्वॅब घेण्यापूर्वी ठोकली धूम 
 

दुकानदार किराणा देईना 
एरव्ही तीन-चार महिने किराणा सलग उधारीवर मिळत होता. मात्र, "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सततचे "लॉकडाउन' आणि त्यात दुकानदारांकडे रोख पैसे देऊन माल घेणाऱ्यांसाठी माल उपलब्ध नाही. परिणामी उधारीच्या ग्राहकांना किराणा देण्यास दुकानदारांनी स्पष्ट नकार दिला आहे. हातात पैसा नाही, दुकानदार उधारीवर किराणा देईना, अशी स्थिती सध्या या कर्मचाऱ्यांची झाली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

 

धक्कादायक : धुळे जिल्ह्यात पाच पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या 8 वर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Municipal Corporation" has exhausted the salaries of health workers