थरारक ! भरधाव वाळूचे डंपर थेट घरात घुसले, गाढ झोपेतील दोन युवकांचा जागीच मृत्यू 

धनराज माळी
Wednesday, 14 October 2020

डंपर चालकाच्या ताबा सुटून हे डंपर त्या वस्तीतील घरात शिरले .घरांची मोडतोड करीत थेट घरात झोपलेल्या दोन युवकांचा बळी घेतल्यावरच हा डंपर त्या ठिकाणी थांबला.

नंदूरबार : नंदुरबार साठी साक्री रस्त्यावरील जेल च्या पुढे असलेल्या नांदरखेडा गावा जवळ बंजारा समाजाच्या वस्तीतील घरात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूचा डंपर शिरल्याने झोपेत असलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या युवकांसाठी ही काळरात्र ठरली. या घटनेनंतर सकाळी दहाला बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी रास्ता रोको करून रोष व्यक्त केला. मात्र पोलिसांनी समजूत काढून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आले.

आवश्य वाचा-  ‘सभा के चारो और बम है’फडणवीसांच्या कार्यक्रमात आली धमकी आणि उडाली खळबळ ! 

याबाबत घटनेची माहिती अशी, नंदुरबार साक्री रस्त्यावर जेल च्या पुढे व नांदरखेडा गावाच्या फाट्याजवळ बंजारा समाजाची शेतातच घर आहेत. याठिकाणी रात्री हे कुटुंब झोपले असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूचा डंपर चालकाच्या ताबा सुटून हे डंपर त्या वस्तीतील घरात शिरले .घरांची मोडतोड करीत थेट घरात झोपलेल्या दोन युवकांचा बळी घेतल्यावरच हा डंपर त्या ठिकाणी थांबला.घटना घडताच चालकाने तेथून पलायन केले. रात्रीच्या अंधारात या कुटुंबाने आरडाओरड करिता आक्रोश केला. ही घटना वाऱ्यासारखी नांदरखेडा गावपरिसरात पसरली. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

बंजारा समाजाचा रास्ता रोको

घटनेची माहिती सर्वदूर पसरताच सकाळी परिसरातील बंजारा समाजातील नागरिकांच्या मोठा समुदाय घटनास्थळी जमला. त्यांनी त्या ठिकाणी रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांची समजूत काढली व कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व कायदेशीर मार्गाने जावे ,कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले ,त्यानंतर समुदाय शांत झाला. या अपघातात प्रवीण बाबूलाल राठोड व विक्रम श्रावण जाधव यांचा मृत्यू झाला आहे.

 

आवर्जून वाचा- खडसेंचा घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश ? असे ठरलेय प्रवेशाचे सुत्र
 

अवैध वाळू वाहतूक कधी बंद होणार

अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने आत्तापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत ,मात्र वाळू वाहतूक सुरूच आहे .त्याच्यावर प्रशासनाच्याही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे .वाळू वाहतुकीच्या डंपरने केवळ या दोनच युवकांचा बळी घेतलेला नाही तर यापूर्वीही अनेक जणांचा बळी गेला आहे. आता तरी प्रशासन लक्ष देईल का ? असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Two youths were killed when a sand dumper rammed into their house