स्वॅब लॅबसाठी प्रशासनाला परवानगीची प्रतीक्षा ; यंत्रसामग्री जिल्हा रुग्णालयाला उपलब्ध 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

लॅब सुरू करण्यासाठी नागपूरच्या ‘आयटीएमआर’ विभागाची परवानगी लागते. ती प्रक्रिया सुरू आहे. तो विभाग सर्वप्रथम नंदुरबार येथील लॅबमधील नमुने अहवाल व धुळे येथील तपासणी अहवालाची पडताळणी करेल.

नंदुरबार  : कोरोनाची वाढती रुग्ण लक्षात घेता व धुळे येथील स्वॅब तपासणी प्रयोगशाळेवर पडणारा ताण लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र स्वॅब तपासणी लॅब मंजूर झाली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीही जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. मात्र, लॅब सुरू करण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आता लॅब सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला परवानगीची प्रतीक्षा आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धुळे येथील प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. धुळे येथील यंत्रसामग्री मोठी आहे. तिच्यात एकावेळी अडीचशे स्वॅब तपासणीसाठी ठेवता येणे शक्य आहे. नंदुरबारचे स्वॅब अहवालही धुळे येथे तपासणीसाठी पाठविले जातात. अनेकदा त्या यंत्रणेवर ताण येत असल्याने काही वेळा रुग्णांचे तपासणी अहवाल वेळेवर प्राप्त होत नाहीत. त्यामुळे रुग्णांवर तत्काळ उपचार होत नाही. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र स्वॅब तपासणी लॅब मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी केली होती. त्यासाठी आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी, खासदार हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आदींनी पाठपुरावा केला. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र स्वॅब कार्यान्वित करण्यास शासनाने मंजुरी दिली. यंत्रसामग्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाली आहे. ती कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. 

‘आयटीएमआर’च्या परवानगीची प्रतीक्षा 
लॅब सुरू करण्यासाठी नागपूरच्या ‘आयटीएमआर’ विभागाची परवानगी लागते. ती प्रक्रिया सुरू आहे. तो विभाग सर्वप्रथम नंदुरबार येथील लॅबमधील नमुने अहवाल व धुळे येथील तपासणी अहवालाची पडताळणी करेल. त्यात दोन्ही अहवाल योग्य आल्यास संबंधित यंत्रसामग्रीची खात्री केली जाईल. त्यानंतर ती सुरू करण्यास परवानगी मिळेल. पर्यंत परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आरोग्य विभागाला आहे. 

स्वॅब अहवाल प्रलंबित 
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्याहीपेक्षा जास्त संख्या धुळे जिल्ह्याची आहे. त्यामुळे एकाच वेळी धुळे येथील लॅबमध्ये व तेथील कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. त्यातच स्वॅब तपासणी प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाने पछाडले होते. त्यामुळे काही दिवस लॅब बंद होती. या पार्श्वभूमीवर धुळे- नंदुरबारचे स्वॅब तपासणीचे काम बंद होते. त्यामुळे प्रलंबित अहवालाची संख्या वाढली आहे. नंदुरबार जिल्ह्याचे शंभर अहवाल प्रलंबित आहेत. ते उद्यापर्यंत निकाली निघतील, असे सूत्रांनी सांगितले. 
 
नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वंतत्र स्वॅब तपासणी लॅब मंजूर झाली आहे. यंत्रसामग्री शासनाने दिली आहे. ती कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. मात्र लॅब सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी आहे. कारण या लॅबमधील स्वॅब अहवाल व तेच स्वॅब दुसऱ्या लॅबमध्ये तपासून तेथील अहवालाचे कन्फर्मेशन केले जाईल. तेथे त्या लॅबचे अहवाल योग्य मिळताहेत की नाही, ते तपासले जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष स्वॅब तपासणी सुरू होईल. तरीही रोज २५ स्वॅबपेक्षा जास्त तपासणी होणार नाही, यंत्रसामग्रीची क्षमता कमी आहे. 
- डॉ. सातपुते, निवासी वैद्यकीय अधिकारी, नंदुरबार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar waiting permission from the administration for a swab lab