esakal | थेट जि. प. मधून राजकीय वारसदारांचा श्री गणेशा 
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar zp

थेट जि. प. मधून राजकीय वारसदारांचा श्री गणेशा 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : जिल्हा परिषदेला अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून सीमा वळवी व राम रघुवंशी यांच्या रूपाने नवे नेतृत्व लाभलेले आहे. जिल्हा परिषदही युवा पिढीचे नेतृत्व लाभल्याने भाग्यवान ठरली आहे. दोन्हीही ज्येष्ठ नेत्यांचे राजकीय वारसदार असल्याने त्यांच्या रूपाने राजकीय वारसदार म्हणून कारकिर्दीचा श्री गणेशा झाला आहे. 

नक्‍की वाचा - चंद्रकांतदादांनी दाखविलेल्या धाडसाचे अभिनंदन ः एकनाथ खडसे 

प्रत्येक क्षेत्रात आता वारसा हक्क चालविला जातो. राजकीय नेता व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आत्तापर्यंत महत्वाचा पदांवर विराजमान होत असल्याचे वास्तव आहे. काल (ता. १७) झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही तेच घडले. कदाचित तो योगायोग असू शकतो. मात्र दोन प्रमुख नेत्यांचा म्हणजेच माजी आमदारांचा पुत्र व कन्येचा राजकीय कारकिर्दीचा श्री गणेशा चक्क जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदापासून झाला. 

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची राजकीय कारकिर्दही जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच सुरुवात झाली होती. या जिल्ह्यातील राजकीय भीष्म पितामह असलेल्या स्वर्गीय दादासाहेब बटेसिंह रघुवंशी यांचे राजकीय वारसदार म्हणून चंदूभय्या ओळखले जातात. तत्कालीन धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्री. रघुवंशी यांनी राजकारणात प्रत्यक्ष प्रवेश केला. रनाळे (ता. नंदुरबार) गटातून ते प्रथम निवडून आले होते. त्यानंतर थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाची सुत्रे त्यांच्याहाती आली होती. त्यांची कार्यकुशलता व संभाषण कौशल्यातून धुळे- नंदुरबार जिल्ह्यांचे नेतृत्व सांभाळत दोन्ही जिल्ह्यांचे नेते झाले. आमदार झाले. त्यांनी राजकारणात निर्माण केलेली प्रतिमा व वर्चस्वाचा राजकीय वारसदार म्हणून त्यांनी आपला पुत्र ॲड. राम रघुवंशी यांच्याकडे पाहिले. गेल्या दोन वर्षापासून राम यांना सोबत घेऊन राजकारणाचे धडे ते देत होते. त्यातूनच कॉंग्रेसच्या युवा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपविली. मात्र काही महिन्यातच राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कोपर्ली (ता.नंदुरबार) गटातून निवडून आणले. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपद हे राखीव असल्याने ते मिळणे शक्य नाही म्हणून उपाध्यक्षपदाचे दावेदार ते ठरले. अर्थात त्यासाठी त्यांना मोठा संघर्षही करावा लागलेला आहे. मात्र चंदूभय्यांचा राजकीय वारसदाराचा प्रांरभ थेट जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापासूनच झाला. 

सीमा वळवी याही तेवढ्याच नशीबवान ठरल्या आहेत. माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी यांच्या त्या कन्या आहेत. कधी अध्यक्षपदाचा विचारही त्यांनी केला नसावा. मात्र नशीब बलवत्तर असेल तर सर्वकाही योग्य घडते. तसेच सीमा वळवी यांच्या बाबतीत घडले. माजी मंत्री पद्माकर वळवी यांना गेल्या दोन पंचवार्षिकपासून पराभवाचा सामना करावा लागतो आहे. त्यांची राजकीय कारकीर्द चांगलीच राहिली आहे. तरीही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीतही त्यांनी कन्या सीमा यांना अमोणी (ता. तळोदा) गटातून निवडून आणले. माजी मंत्रींची कन्या म्हणून त्यांना फार तर सभापतीपद मिळण्याची चर्चा होती. कारण अनेक जुने जाणते, अनुभवी कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये आहेत. त्यांना संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र अंतर्गत हेवेदावे व पक्षीय परिस्थिती भक्कम करण्याच्या दृष्टीने माजी आमदार वळवी यांना जनतेच्या संपर्कात राहता यावे, या उद्देशाने पक्षीय नेत्यांनी अंतिम क्षणाला सीमा वळवी यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला. अत्यंत कमी वयात आणि राजकीय प्रशिक्षण काळातच थेट अध्यक्षपदापासून राजकीय वारसदाराचा श्री गणेशा झाला. हा सर्वांसाठी सुखद धक्का देणारा व कौतुकास्पद मानले जाते.