esakal | जि. प. मध्ये पुन्हा भिंत चालली 
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar-zp

जि. प. मध्ये पुन्हा भिंत चालली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या दालनातील भिंतीबाबत कारवाईचा खुलासा करण्याची मागणी करत भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य आज ‘पहिले आमचे उत्तर द्या, तरच सभेला सुरूवात करा‘ अशी मागणी करत सभेत आक्रमक झाले. अध्यक्षासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला न जुमानता ते आपल्या मागणीवर ते ठाम राहीले. या गोंधळातच विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा झाली. मात्र ग्रामपंचायत निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले नाहीत अथवा मंजुरी देण्यात आली नाही. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. उपाध्यक्ष राम रघुवंशी, बांधकाम व अर्थ विभागाचे सभापती अभिजित पाटील, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती उपस्थित होते. 
सभेला सुरूवात होताच जिल्हा परिषद सदस्या अर्चना गावित, जयश्री गावित या भगिनींनी आम्हाला सीईओंनी आश्‍वासन दिले आहे, त्याचे उत्तर द्या, सीईओंना बोलवा, सभा चालू देणार नाही, आधी आमचे उत्तर द्या, असे म्हणत कामकाज रोखून धरले. सीईओ साहेब हाय हाय अशा घोषणा देत गोंधळ सुरू झाला. 
अध्यक्षा सीमा वळवी, श्री. बेडसे, श्री.रौंदळ, अभिजित पाटील, रतन पाडवी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार आहे, तुमचे उत्तर देऊ, मात्र सध्या सीईओ व संबधित विभागाच्या सभापती रजेवर आहेत. ते नसल्याने तुम्हाला उत्तर कोण देईल, असे सांगितले. मात्र गावित भगिनी एकण्यास तयार नव्हत्या, याबाबत त्यांच्या गटाच्या सदस्यांनीही त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. उलट नियमात काम होत नाही, गुन्हेगारांना पाठिशी घालतात, असे म्हणत प्रथम अर्चना गावित या सभेतून बाहेर पडल्या. त्यानंतर जयश्री गावित यांनी सभागृह सोडले. मात्र त्यांच्या गटाचे सदस्य सभागृहातच बसून होते. त्यांना बाहेर पडण्यासाठी निरोप पाठविला गेला, तोपर्यंत सभा संपली होती. 
 
गोंधळातच झाली सभा 
अर्चना गावित, जयश्री गावित यांनी सभेचे कामकाज थांबवा, आधी आमच्या प्रश्‍नाचे उत्तर द्या, असे म्हणत राहिल्या. सत्ताधाऱ्यांनी मात्र विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा करत सभा सुरूच ठेवली. श्री. बेडसे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचन करत अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागाचा आढावा दिला. सदस्यांनी ठराविक मुद्यांवर चर्चा केली. 
 
निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस 
जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक यांनी नंदुरबार जिल्ह्यात निरंतर शिक्षण आहे की नाही, काहीच कळत नाही. त्यांचे अधिकारी कोण, त्यांचे काय काम सुरू आहे. त्यांचे कार्यालय कुठे हेच कळत नाही असा प्रश्‍न उपस्थित केला. प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.आर. रोकडे यांनी संबंधित कार्यालय धुळे व नंदुरबार असे संयुक्त आहे. ते धुळे येथेच कार्यान्वित आहे. अधिकारी तेथे असतात, त्यांना सभेबाबत कळविले जाते असे सांगितले. मात्र कळवूनही ते सभेला येत नाही म्हणून त्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

होळीसाठी निधी द्यावा 
काठी (ता. अक्कलकुवा) येथील राजवाडी होळीसाठी विशेष बाब म्हणून निधी देण्यात यावा हा विषय अजेंड्यावर होता. मात्र आचारसंहितेमुळे त्यावर चर्चा झाली नाही. सदस्य विजय पराडके यांनी सातपुड्यातील नावाजलेल्या सर्वच होळींना निधी द्यावा, अशी मागणी केली. यावर अध्यक्षा वळवी यांनी ग्रामपंचायत निवडणुकींचा आचारसंहितेचा मुद्दा सांगून पुढील सभेत त्यावर नक्कीच चर्चा केली जाईल असे सांगितले.