esakal | नवापूर तालुक्यात पेट्रोलियम पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध 
sakal

बोलून बातमी शोधा

नवापूर तालुक्यात पेट्रोलियम पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध 

पेट्रोलियम पाइपलाइनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया अपूर्ण असताना, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दादागिरी व धमकावून पाइपलाइनचे काम काही ठिकाणी सुरू केले आहे.

नवापूर तालुक्यात पेट्रोलियम पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध 

sakal_logo
By
विनायक सूर्यवंशी

नवापूर  : तालुक्यातून जाणाऱ्या इंडियन ऑईल कॉरर्पोरेशनची केंद्रीय पेट्रोलियम पाइपलाइनला तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अधिकारी व बाधित शेतकरी यांच्यातील वादविवाद दिवसागणिक वाढत आहे. यांच्यातील सुसंवाद साधून आणण्यासाठी ३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी नवापूर तहसीलदार कार्यालयात बैठक घेणार आहेत. 

आवश्य वाचा- धुळ्यातील कचरा डेपो होणार मोकळा; बायोमायनिंगच्या कामाला वेग !
 

नवापूर तालुक्यातून इंडियन ऑईल कॉरर्पोरेशन लिमिटेड कंपनीची केंद्रीय पेट्रोलियम पाइपलाइनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया अपूर्ण असताना, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दादागिरी व धमकावून पाइपलाइनचे काम काही ठिकाणी सुरू केले आहे. त्यास वारंवार शेतकरी विरोध करीत आहेत. वारंवार शेतकरी व संघटना तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन काम बंद पाडतात. यावर तोडगा किंवा योग्य मध्यस्थी करण्यासाठी ३ नोव्हेंबरला नवापूर तहसील कार्यालयात बैठक होणार आहे. तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. सी. गावित यांनी केले आहे. 

दरम्यान, पेट्रोलियम पाईपलाइनचे काम बंद करावे, या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. सी. गावित व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना निवेदन दिले. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाइपलाइनच्या कामाचे राजपत्रात बदल करून तालुक्यातून जाणारी पाइपलाइनचे काम बंद करावे, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर यापुढे तीव्र आंदोलन करू, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. सी. गावित, भूमीजन परिवर्तन किसान मजदूर संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप गावित, राजू गावित, वसंत गावित, जयंत गावित, रमेश गावित, गुलाबसिंग गावित, सुमान गावित, प्रफुल्ल गावित, प्रताप गावित आदी उपस्थित होते.  

संपादन- भूषण श्रीखंडे