esakal | धुळ्यातील कचरा डेपो होणार मोकळा; बायोमायनिंगच्या कामाला वेग !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यातील कचरा डेपो होणार मोकळा; बायोमायनिंगच्या कामाला वेग !

दहा एकर जागेवर शहरातून रोजचा निघणारा कचरा टाकायला जागा नाही. कचऱ्यामुळे आरोग्यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केला.

धुळ्यातील कचरा डेपो होणार मोकळा; बायोमायनिंगच्या कामाला वेग !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे  ः महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोवर साचलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित कंपनीने कचऱ्याच्या वर्गीकरणाचे (स्क्रीनिंग) काम सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कचरा डेपो मोकळा होईल व रोजचा कचरा टाकण्यासाठी जागेचा प्रश्‍नही निकाली निघेल, अशी अपेक्षा आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांचे या कामाकडे विशेष लक्ष व पाठपुरावा आहे. 

आवश्य वाचा- रूग्‍ण घटले तरी ॲन्टिजेन किटचा तुटवडा; संपर्कातील व्यक्तींच्या टेस्टिंग नाहीच 

वरखेडी रोडवर साधारण नऊ-दहा एकरावर महापालिकेचा कचरा डेपो आहे. वर्षानुवर्षांपासून साचणाऱ्या कचऱ्यावर कोणत्याही प्रक्रिया न झाल्याने कचऱ्याचे डोंगर उभे राहिले. परिणामी, या दहा एकर जागेवर शहरातून रोजचा निघणारा कचरा टाकायला जागा नाही. कचऱ्यामुळे आरोग्यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केला. या प्रकल्पात कचरा संकलन ते कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाटीपर्यंतच्या कामांची तरतूद आहे. यात बायोमायनिंगचा समावेश आहे. 

बायोमायनिंग अंतर्गत कामाला वेग 
धुळे महापालिकेने बायोमायनिंगचे काम ईबी एनव्हिरो बायोटेक प्रा. लि. (नाशिक) कंपनीला दिले आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच कचऱ्यावर केमिकल फवारणी करून कामाला सुरवात केली होती. आता दोन-तीन दिवसांपासून कंपनीने कचरा वर्गीकरण सुरू केले आहे. दोन पोकलॅन, तीन स्क्रीनिंग मशिन्स व मनुष्यबळाद्वारे हे काम सुरू आहे. 

खताचा दर्जा तपासणार 
केमिकल फवारणी झालेल्या कचऱ्यातून आता प्लॅस्टिक, दगड व इतर वस्तू वेगळ्या करण्यात येत असून, शिल्लक राहिलेली माती खत म्हणून वापरता येणार आहे. या खताचा दर्जा तपासून नंतर ते शेतकऱ्यांना विक्रीसाठी ठेवले जाईल. 

आवर्जून वाचा- शेतीच्‍या पोटहिस्‍याचा स्‍वतंत्र सातबारा
 

सहा-सात एकर जागा पुनर्प्राप्त 
बायोमायनिंगची प्रक्रिया पूर्ण करून कचरा डेपोवरील साधारण ९० टक्के जागा पुनर्पाप्त करून घेणे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक आहे. धुळे महापालिकेने ८९ हजार क्यूबीक मीटर क्षेत्रावरील कचऱ्याच्या बायोमायनिंगचे काम दिले आहे. यातून साधारण सहा-सात एकर जागा पुनर्पाप्त होईल, असा अंदाज आहे. बायोमायनिंगचे काम योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी आयुक्त अजीज शेख यांचे विशेष लक्ष असून, सहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव या कामावर लक्ष ठेवून आहेत. 

- मंजूर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ... २५,८५,१५,२३७ 
- बायोमायनिंगसाठी ... तीन कोटी ७८ लाख २५ हजार 
- बायोमायनिगचे काम ... ईबी एनव्हिरो बायोटेक प्रा. लि. (नाशिक) 
- ८९ हजार क्यूबीक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया  

संपादन- भूषण श्रीखंडे