अंत्योदय, बीपीएल, प्राधान्य शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ 

प्रा. भूषण बिरारी 
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य त्यात तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळणार आहेत. गहू आठ रूपये किलो व तांदूळ बारा रूपये किलो दराने मिळणार आहे. 

पातोंडा (ता. अमळनेर) : सध्या जगभर कोविड १९ विषाणूशी दोन करताना सर्वच सरकारांची धावपळ होत आहे. असे असताना भारत सरकारने मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेत सर्वच मध्यमवर्गीय शेतकरी व मजूर कुटुंबांना फार मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने पुरविलेल्या मोफत अन्नधान्याच्या वाटप प्रक्रियेला राज्य सरकारांकडून जवळपास १५ एप्रिल पासून सुरवात होणार आहे. या अंतर्गत पातोंडा येथे १३४४ शिधापत्रिका धारकांना याचा लाभ होणार आहे. 

पातोंडा येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटींतर्गत दोन रेशन दुकाने चालवली जातात. या दोन्ही रेशन दुकानातील १४५४ शिधापत्रिका धारक असल्याची माहिती सेल्समन भिकन पाटील व अमोल चौधरी यांनी दिली. शिधापत्रिका धारकांपैकी अंत्योदय (२२८), बीपीएल (३७१), राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत समाविष्ट (३१०) केसरी शिधापत्रिका (एपीएल) धारकांना नियमीत अन्नधान्याच्या पुरवठ्यासह एप्रिल ते जून या तीन महिन्यांकरीता प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. नियमीत मिळणारे धान्याकरीता त्यांना पैसे मोजावे लागतील. उर्वरीत प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत. मात्र, ४३५ केसरी शिधापत्रिका (एपीएल) धारक ज्यांचे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेशन नसणाऱ्या व ज्यांचे उत्पन्न एक लाखांच्या आत आहे असे केसरी शिधापत्रिका धारकांना ९ एप्रिलच्या शासन परीपत्रका नुसार मे व जून या दोन महिन्यांकरीता प्रती व्यक्ती तिन किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळणार आहेत. मात्र, त्यांना गहूसाठी प्रती किलो आठ रूपये व तांदूळ करीता प्रती किलो बारा रूपये असा आकार द्यावा लागणार आहे.

नक्की वाचा : चाळीसगावातील सहा जण तपासणीसाठी जळगावला आणले 
 

एकीकडे अंत्योदय, बीपीएल व प्राधान्यातील शिधापत्रिका धारकांना मोफत अन्नधान्य मिळणार असून दुसरीकडे नेहमी रेशनमधील अन्नधान्यापाहून वंचित असणाऱ्या केसरी शिधापत्रिका धारकांना मात्र त्याच अन्नधान्याकरीता पैसे मोजावे लागणार आहेत. ही एक प्रकारे केसरी कार्डधारकांना थट्टाच शासनाने चालवली आहे, अशी व्यथा केसरी शिधापत्रिका धारकांकडून व्यक्त केली जात आहे. कारण हे केसरी शिधापत्रिका धारक सधन अथवा नोकरदार नसून सर्वसाधारण शेतकरीच आहेत. आधीच पातोंडा व परिसरातील शेतकरी हा अतिवृष्टी बाधीत आहे. त्यात अतिवृष्टीमुळे खरीपाचे उत्पन्न बुडाले असून आधीच विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने मोफत अन्नधान्य पुरवठा करायला हवा होता. मात्र, दुष्काळात तेरावा महिना प्रमाणे कोरोनात तेरावा महिना म्हणण्याची वेळ या शेतकरी कुटूंबांवर येऊन पोहचली आहेत. दरम्‍यान, संपुर्ण जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसणाऱ्या व उत्पन्न एक लाखांच्या आत असणाऱ्या ३१२६४९ केसरी शिधापत्रिका धारक ज्यात १३४७८३० व्यक्तींना सवलतीच्या दरातील अन्नधान्याच्या लाभ होणार आहे. या अंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य त्यात तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळणार आहेत. गहू आठ रूपये किलो व तांदूळ बारा रूपये किलो दराने मिळणार आहे. 

पातोंडा येथील शिधापत्रिका धारकांची स्थिती 
- अंत्योदय ः २२८ 
- बीपीएल ः ३७१ 
- प्राधान्य ः ३१० 
- केसरी ः ४३५ 
- पांढरे ः ११० 
- एकूण ः १४५४ 
 

आर्वजून पहा : "लॉकडाउन'मध्ये संकल्पना...तरुणाने थाटला "ऑनलाइन' भाजीबाजार  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pantoda Free rice to Antyodaya, BPL, Preferred card holders