residentional photo
residentional photo

सप्तश्रृंगीच्या देवीच्या गाभाऱ्यात नो एंन्ट्री...नव्या वर्षात अमंलबजावणी,ट्रस्टचा निर्णय

नाशिक,: खान्देशचे कुलदैवत व साडेतीन शक्तीपीठांतील अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीचे पावित्र्य राखण्यासाठी देवीचे गाभारा दर्शन भाविकांना येत्या 1 जानेवारीपासून घेता येणार नाही. तसा निर्णय श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने घेतला आहे. मात्र, आरतीसाठीचे यजमान आणि पुजाऱ्यांना सोवळ्यात असणे बंधनकारक असणार आहे. ट्रस्टच्या या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली गाभारा दर्शनासंदर्भातील चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

        साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेले सप्तशृंगी देवीच्या गाभारा दर्शनासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यासंदर्भात आज श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रभारी प्रधान न्यायधीश गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. न्या. देशमुख यांनी म्हणाले, राज्यातील तुळजापूर, कोल्हापूर, माहूर येथे देवीचे दर्शन गाभाऱ्यातून घेतले जात नाही. तसेच, त्याठिकाणी पुजाऱ्यांनाच फक्त गाभाऱ्यात जाण्यास परवानगी आहे. तर, पूजा वा आरतीचा मान असलेल्यांना सोवळ्यातच जावे लागते. त्याच धर्तीवर

हा निर्णय घेतला आहे.

पावित्र्य राखण्याचा प्रयत्न

    श्री सप्तशृंगी देवीचे पावित्र्य राखण्यासाठी थेट गाभाऱ्यातील दर्शन पद्धत येत्या 1 जानेवारीपासून बंद करण्यात येते आहे. मात्र त्याचवेळी पुजारी आणि आरतीसाठी असलेल्या यजमानांना मात्र गाभाऱ्यात जाता येईल. पण त्यासाठी त्यांना पारंपरिक पद्धतीच्या सोवळ्यातच प्रवेश दिला जाणार आहे असेही न्या. देशमुख यांनी स्पष्ट केले. 

पूजा,आरतीसाठीच सोवळ्यात प्रवेश

    सप्तशृंगीदेवीची दिवसभरात होणाऱ्या आरतीसाठी असलेल्या यजमानांसाठी सोवळ्याचे बंधन असून, पुरुषांना सोवळे तर महिलांना साडी बंधनकारक राहील. यापूर्वी गाभारा दर्शनासाठी देण्यात येणारी पास पद्धत आता बंद केली जाणार आहे. ग्रामसभेच्या ठरावानुसार आणि विश्‍वस्त मंडळाच्या एकमुखी मताद्वारे गाभारा दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ट्रस्ट अध्यक्ष न्या. देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी ट्रस्टचे विश्‍वस्त रावसाहेब शिंदे, उन्मेश गायधनी, राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे उपस्थित होते. 

देवीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये समानता असावी, याच एकमेव हेतूने आणि देवी-मंदिराचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी गाभारा दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सशुल्क आकारून दर्शन नाही की व्हीआयपी पास पद्धतही बंद असेल. आरतीसाठीचे यजमानांनाही सोवळ्यातच प्रवेश दिला जाईल. जेणेकरून देवीचे पावित्र्य राखणे शक्‍य होईल. 
- न्या. गणेश देशमुख, अध्यक्ष, श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट. 


- भक्तनिवासाचे आधुनिकीकरण सुरू 
- ऑनलाईन दर्शन आणि निवास बुकिंगसाठी येत्या मार्चपर्यंत ऍप विकसित 
- मंदिराच्या पहिल्या पायरीजवळच पंढरपुरच्या धर्तीवरील दर्शन रांग इमारतीचे काम पूर्णत्वास 
- व्हिआयपी पासअंतर्गत भाविकांनाही दर्शनासाठी गाभारा प्रवेश नाही 
- सप्तशृंगी देवीवर आधारित डॉक्‍युमेंट्री फिल्म तयार; लवकरच होणार प्रकाशन 


अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाही सोवळ्यातच दर्शन 
शासकीय नियमानुसार (प्रोटोकॉल) निश्‍चित केलेल्या अतिमहत्त्वाच्या-महत्त्वांच्या पदांवरील व्यक्तींना गाभारा दर्शन घेता येणार आहे. मात्र त्यांनाही गाभाऱ्यात प्रवेश करताना सोवळ्यातच जावे लागेल. त्यासाठीचे सोवळे ट्रस्टमार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुजारी आणि आरतीच्या यजमानांशिवाय कोणत्याही भाविक व्यक्तीला गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com