महाविकास आघाडीच्या नेत्यांना दाखवावे लागणार एकीचे बळ

कमलेश पटेल
Tuesday, 24 November 2020

भाजपकडूनही विजयाची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे नेमका विजय कोणाचा, हे प्रत्यक्ष निकालानंतरच समजेल. मात्र, विधान भवनात संख्याबळ वाढविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

शहादा  : विधान परिषदेच्या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी धुळे- नंदुरबार जिल्ह्यांत होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी काही दिवसांचाच शिल्लक आहे. भारतीय जनता पक्षाचे अमरिशभाई पटेल व महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. या निवडणुकीत अभिजित पाटील नवखे असले, तरी त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे बळ आहे. यामुळे भाजपसमोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे. धुळ्यात भाजपच्या नेत्यांनी अमरिशभाई पटेल यांना ‘विजयी भव’ सांगून निर्धास्त राहण्याचे सांगितले, तर दुसरीकडे विधान परिषदेतील संख्याबळ एकने वाढविण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांना एकीचे बळ दाखवत उमेदवाराला निवडून आणणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

वाचा- गांजामुळेच अधिकाऱ्यांची पाच कोटीची चांदी
 

कोरोनामुळे स्थगित झालेली विधान परिषदेची निवडणूक पुन्हा होत असल्याने आता आमदार कोण, याची चर्चा सध्या दोन्ही जिल्ह्यांत रंगत आहे. भाजप व महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत असली तरी कोणत्याही एका पक्षाकडे उमेदवार निवडून येणे एवढे संख्याबळ नाही. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकदिलाने काम करत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पूर्ण ताकदीनिशी इतर पक्षातील व अपक्ष मतदारांच्या पाठिंबा घेऊन मदत केल्यास महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांचा विजय निश्चित होऊ शकतो. दुसरीकडे धुळ्यात झालेल्या भाजपच्या प्रशिक्षण वर्गात उमेदवार अमरिशभाई पटेल यांना ‘विजयी भव’चा सूर आळवला. 

पक्षनिष्ठा की व्यक्तिनिष्ठा? 
गेल्या दोन वर्षांपासून सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये पक्षांतराचे वारे सुरू आहे. ‘सत्ता तिथे वलय’ या उक्तीप्रमाणे भाजप सरकारच्या काळात अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, स्वीकृत नगरसेवकांनी पक्षांतर केले. नंतर महाआघाडीची सत्ता आल्यानंतर पुन्हा या पक्षात काहीजण आले. त्यामुळे ज्या पक्षाच्या तिकिटावर हे मतदार निवडून आले आहेत, ते आता आपल्याला पक्षाने तिकीट दिले म्हणून निवडून आलो हे लक्षात ठेवून पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करणार की व्यक्तिनिष्ठा म्हणून ज्यांच्या आधिपत्याखाली निवडणूक लढवली व नंतर पक्षांतर केलेल्या उमेदवाराला मतदान करणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. 

व्हीप जारी केल्यास 
या निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडे २१२, तर भाजपकडे २०३ एवढे संख्याबळ आहे. एकूण मतदार ४३७ असून, निवडून येण्यासाठी २१९ मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीने व्हीप जारी केल्यास अपक्ष व इतरांच्या मदतीने अभिजित पाटील यांच्या विजय सहज होऊ शकतो. मात्र, भाजपकडूनही विजयाची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे नेमका विजय कोणाचा, हे प्रत्यक्ष निकालानंतरच समजेल. मात्र, विधान भवनात संख्याबळ वाढविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shada mahavikas aghadi will have to show the strength of unity