राज्यातील १४ हजार ग्रा.पं.चा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 

निलेश पाटील
Tuesday, 24 November 2020

राज्य निवडणूक आयोगाने यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. एक डिसेंबरला प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी जाहीर केली जाईल.

शनिमांडळ : कोरोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासक राज आता संपुष्टात येणार आहे. मुदत संपलेल्या राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये मतदार याद्यांचे काम पूर्ण झाल्यावर जानेवारी- फेब्रुवारीत प्रत्यक्ष निवडणूक होऊ शकणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायतीचा यात समावेश असणार आहे. 

हेही वाचा- अन्नदान करायचय ; तर दोन वर्षे थांबा  
 
ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी असल्यानेमुळे गावातील कार्यकर्ते नाराज झाले आहे. लवकर निवडणुका व्हाव्यात,अशी अपेक्षा इच्छुकांकडून व्यक्त केली जात होती. आता राज्य निवडणूक आयोगाने यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. एक डिसेंबरला प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी जाहीर केली जाईल. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर २०२० पर्यंत तयार केलेली मतदार यादी आधार धरण्यात येईल. त्यावर सात डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर १० डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. मतदारयादी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनेही करण्यात येणार आहे. 

नंतर नियमानुसार प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यामुळे नव्या वर्षात ग्रामपंचायतींवरील प्रशासकराज संपुष्टात येऊन लोकांनी निवडून दिलेले सदस्य म्हणून काम पाहू लागतील. त्यामुळे आता ग्रामीण भागातील राजकारणाची रणधुमाळी सुरू होणार आहे. मात्र,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठीही निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या बदलानुसार सरपंच गावकऱ्यांच्या मतदानातून नव्हे तर सदस्यांमधून निवडण्यात येणार आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shanimandal election program of fourteen thousand gram panchayats in the state announced