मुलाने आत्‍महत्‍या केली म्‍हणून पेटविली बाजरी; पोलिसात तक्रार

सचिन पाटील
Tuesday, 29 September 2020

घडलेल्‍या प्रकारात बाजरीची कणसे जळाल्‍याने ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. संशयितांनी मुलाविरोधातील गुन्ह्याचे प्रकरण मिटवण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली.

शिरपूर (धुळे) : मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या एकाच्या शेतातील बाजरीची कणसे पेटविण्याचा प्रकार झाला. या संशयावरुन सांगवी (ता.शिरपूर) पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सदरची घटना २७ सप्टेंबरला दुपारी बाराला दहिवद (ता.शिरपूर) शिवारात घडली. गीताबाई हरचंद गायकवाड (वय ६०, रा.दहिवद) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील विक्रम किसन गोपाळ यांचा मुलगा कैलास गोपाळ याने ३० ऑगस्टला गळफास घेवून आत्महत्या केली. गीताबाईचा मुलगा जितेंद्र गायकवाड याने पैशांच्या वसुलीसाठी त्रास दिल्याने त्याने आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि गायकवाडमुळे आपला मुलगा मेल्याचा राग मनात ठेवून संशयित विक्रम गोपाळ, मोतीराम गोपाळ, तोताराम गोपाळ व राजू गोपाळ (सर्व रा.दहिवद) यांनी गायकवाड यांच्या शेतात मळणीसाठी कापून ठेवलेली बाजारीची कणसे पेटवून दिल्‍याची तक्रार दिली आहे. या घडलेल्‍या प्रकारात बाजरीची कणसे जळाल्‍याने ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. संशयितांनी मुलाविरोधातील गुन्ह्याचे प्रकरण मिटवण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच आपल्यासह नातवाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. 

मारहाण करत युवकाला लुटले
युवकाला मारहाण करुन त्याचा मोबाईल, चांदीचे ब्रासलेट व रोकड लुटल्याच्या संशयावरुन चार जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना लौकी (ता.शिरपूर) येथे घडली. कुणाल बबन केदार (रा.जनता नगर, शिरपूर) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. संशयित अनिल भाईदास वाघ, योगेश सुनील वाघ, दिनेश वाघ, सुनिल वाघ (सर्व रा.लौकी) यांनी योगेश वाघ याच्या घरासमोर कुणालला मारहाण केली. त्याच्याकडून साडेसात हजारांचा मोबाईल, हातातील चांदीचे ब्रासलेट व खिशातील एक हजार ३०० रुपयांची रोकड काढून घेतली.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur boy suicide and farm bajri fire