आधी सत्कार, मग तक्रार : वेळेवर नाश्‍ता न मिळाल्याने रुग्णांचा आक्रमक पवित्रा 

सचिन पाटील
Friday, 7 August 2020

रुग्णांना उत्कृष्ट दर्जाचा अन्नपुरवठा केला जातो. शासनाच्या मानकांनुसार जेवण दिले जाते. आजचा प्रकार तांत्रिक कारणांमुळे घडल्याचे दिसते. मात्र आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित पुरवठादाराला नोटीस दिली आहे. 
-डॉ. प्रसन्न कुलकर्णी 

शिरपूर : वेळेवर नाश्ता न मिळाल्याच्या कारणावरून शिंगावे (ता. शिरपूर) येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांनी शुक्रवारी (ता. ६) जेवणावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यावर तणाव निवळला. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांशी चर्चा केली. दरम्यान भोजन पुरवठादाराला आरोग्य विभागाने नोटीस बजावली. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनेंतर्गत शिंगावे येथे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर कार्यान्वित आहे. शुक्रवारी सकाळी तेथील रुग्ण नाश्ता घेण्यासाठी सेंटरच्या मैदानात जमले. नाश्त्याची वेळ सकाळी आठला निश्चित असताना पुरवठादाराने सकाळी दहाला नाश्ता पाठवल्याच्या कारणावरून महिला कामगार व रुग्णांत वाद झाला. नाश्त्यासह जेवणावर बहिष्कार घालण्याची धमकी काही रुग्णांनी दिली. उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद संपुष्टात आला. 
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक हेमंत पाटील, देवेंद्र राजपूत, विकी चौधरी, चंद्रकांत पाटील, महेंद्र पाटील, तुषार पाटील, गणेश चौधरी आदींनी कोविड सेंटरला भेट दिली. तेथील रूग्णांशी चर्चा केली. तहसीलदार आबा महाजन यांनी संबंधित पुरवठादाराशी संपर्क साधून भोजन पुरवठ्याची वेळ न पाळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला. 
 
रिक्षा नादुरूस्‍तमुळे अडचण 
नेहमीची रिक्षा नादुरुस्त झाल्याने महिला कामगाराने दुसऱ्या रिक्षाचालकाला बोलवले. मात्र रस्त्यात कोविड सेंटरला जावे लागणार असल्याचे कळताच त्याने पुढे जाण्यास नकार देऊन रिक्षा मागे वळवली. पर्यायी वाहनाची सोय करण्यात वेळ गेल्याने उशीर झाल्याचे संबंधित महिलेने आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले. 
 
आधी सत्कार, मग तक्रार : 
शिंगावे कोविड सेंटरला खर्दे (ता. शिरपूर) येथील पुरवठादारातर्फे नाश्ता व जेवण दिले जाते. उत्कृष्ट दर्जा राखल्याबद्दल गुरुवारी (ता. ५) संबंधित पुरवठादार व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र सत्काराला २४ तास उलटत नाहीत तोच रूग्णांनी तक्रार केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
 

 
रुग्णांची तक्रार प्रामुख्याने जेवणाच्या वेळेबाबत होती. त्याची माहिती तहसीलदारांना दिली. पुरवठादाराशी बोलून त्यालाही तंबी दिली. यापुढे कटाक्षाने वेळ पाळण्याची हमी त्याने दिली आहे. 
-हेमंत पाटील, शहराध्यक्ष, भाजप 
 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur covid center snack late today petients agresive