esakal | ‘पीएम’ योजनेत एका दिवसांत साडेपाच लाखांचा भरणा 
sakal

बोलून बातमी शोधा

pm kisan yojana

पीएम’ किसान योजनेच्या निकषात बसत नसतानाही काहींनी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांप्रमाणे वार्षिक एकूण सहा हजार रुपयांचा लाभ घेतल्याचे आयकर विभागाच्या पडताळणीत आढळले होते.

‘पीएम’ योजनेत एका दिवसांत साडेपाच लाखांचा भरणा 

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : प्रशासनाची दिशाभूल करून एक हजार १७ नोकरदार व आयकरदात्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असून, त्यांना वसुलीची नोटीस बजावल्याबाबत ‘सकाळ’मधून सोमवारी (ता. २) वृत्त प्रकाशित होताच संबंधितांमध्ये खळबळ उडाली. लाभार्थ्यांनी सोमवारीच तब्बल एकूण पाच लाख २२ हजार रुपयांची रक्कम परत केली. 
तालुक्यातील सातही मंडलात महसूल विभागाने धडक मोहीम राबवून वसुलीच्या कामाला वेग दिला आहे. ‘पीएम’ किसान योजनेच्या निकषात बसत नसतानाही काहींनी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांप्रमाणे वार्षिक एकूण सहा हजार रुपयांचा लाभ घेतल्याचे आयकर विभागाच्या पडताळणीत आढळले होते. या लाभार्थ्यांमध्ये नोकरदार आणि करदात्यांचा समावेश आहे. तहसीलदार आबा महाजन यांनी अपात्र लाभार्थ्यांना नोटिसा बजावून रक्कम भरा अथवा सक्त वसुलीच्या कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला होता. त्यामुळे घेतलेल्या लाभाच्या रकमेचा परतावा करण्यास बहुतेकांनी वेग दिला. 

५१ लाभार्थ्यांनी भरले पैसे
शिरपूर मंडलांतर्गत आठ लाभार्थ्यांनी ७४ हजार रुपये, सांगवी मंडलांतर्गत सहा लाभार्थ्यांनी ७२ हजार रुपये, बोराडी मंडलांतर्गत नऊ लाभार्थ्यांनी ८६ हजार रुपये, अर्थे मंडलांतर्गत दहा लाभार्थ्यांनी एक लाख बारा हजार रुपये, जवखेडा मंडलांतर्गत चार लाभार्थ्यांनी ३८ हजार रुपये, तर होळनांथे मंडलांतर्गत चौदा लाभार्थ्यांनी एक लाख ४० हजार रुपये परत केले. या पुढेही ही मोहीम धडाक्याने सुरू ठेवली जाईल, अशी माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी दिली. मंडलाधिकारी संजय जगताप, प्रशांत ढोले, अशोक गुजर, प्रवीण मराठे, भटू बोरसे, प्रभाकर गावित, व्ही. के. बागूल, तलाठी देवेंद्र येशी, मुकेश भावसार, सुरेश बाविस्कर, रिजवान खान, बाळासाहेब सानप, अमृत राजपूत, राकेश साळुंखे, बोरसे, रेणुका राजपूत, स्वाती कोळी, स्वाती वाघ, मनीषा जाधव, भारती पवार वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे