esakal | पुर्ण गावाला धान्य देतोस मग मला का नाही; असे म्‍हणत पुतण्याने केले कुऱ्हाडीने वार
sakal

बोलून बातमी शोधा

murder

मारून टाकण्याची धमकी देत तो घरात पळत गेला. हातात कुऱ्हाड घेऊन परतलेल्या गोपालने बाळू गायकवाड यांच्या डोक्यात मध्यभागी व उजव्या डोळ्याजवळ खोलवर घाव घातला. ते रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले.

पुर्ण गावाला धान्य देतोस मग मला का नाही; असे म्‍हणत पुतण्याने केले कुऱ्हाडीने वार

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : तू सर्व गावाला धान्य वाटतोस, फक्त मला देत नाही. तुला मारूनच टाकतो म्हणत काकाच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा वार करून पुतण्याने त्याचा निघृण खून केला. ही घटना सोमवारी (ता. १७) दुपारी साडेचारला तरडी (ता. शिरपूर) येथे घडली. हिसाळे (ता. शिरपूर) गणाचे पंचायत समिती सदस्य तथा तरडी येथील स्वस्त धान्य दुकानदार बाळू बुधा गायकवाड (भिल, वय ५६) या हल्ल्यात ठार झाले. संशयित गोपाल भागवत गायकवाड (रा. तरडी) याला थाळनेर पोलिसांनी अटक केली. 

मृत बाळू गायकवाड डिसेंबर २०१९ ला भारतीय जनता पक्षातर्फे शिरपूर पंचायत सदस्य म्हणून निवडून गेले होते. वीस वर्षापासून ते तरडी गावात स्वस्त धान्य दुकान चालवित होते. कोरोनाच्या भीतीमुळे ते शिधापत्रिकाधारकांच्या घरी जाऊन स्वस्त धान्य वाटत होते. सोमवारी दुपारी धान्य वाटपानंतर संबंधितांकडे पावत्या दिल्यानंतर ते मुलगा उमेश गायकवाडसोबत घरी जात होते. गावातील मारुती चौकात संशयित गोपाल गायकवाड याने त्यांना पाहून घराबाहेर येऊन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. 

घरात गेला अन्‌ आणली कुऱ्हाड
रेशनचे धान्य दिले जात नसल्याचे त्याचे म्हणणे होते. गायकवाड पितापुत्रांनी त्याला दुकानावर ये आणि धान्य घेऊन जा असे सांगून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मारून टाकण्याची धमकी देत तो घरात पळत गेला. हातात कुऱ्हाड घेऊन परतलेल्या गोपालने बाळू गायकवाड यांच्या डोक्यात मध्यभागी व उजव्या डोळ्याजवळ खोलवर घाव घातला. ते रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले. उमेशने आरडाओरड केल्याने त्याचे चुलत काका छोटू गायकवाड, लताबाई गायकवाड, भाऊ प्रवीण गायकवाड आदी मदतीसाठी धावून गेले. त्यांनी गोपालच्या तावडीतून बाळू गायकवाड यांची सुटका करून त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे हलवण्यात आले. मात्र त्यांचा रात्री साडेअकराला मृत्यू झाला. थाळनेर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन साळुंखे व सहकाऱ्यांनी संशयित गोपाल गायकवाडला अटक केली. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित गोपाल मृत बाळू गायकवाड यांचा चुलत पुतण्या आहे. 
 
दुकानदारांचे निवेदन 
दरम्यान बाळू गायकवाड यांच्या हत्येच्या निषेधार्थ येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे मंगळवारी (ता. १८) तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले. संशयितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image