जळीत घटनांतून दिव्यांगत्व,विद्रुपपणा आलाय,घाबरू नका...स्किन बॅंक देईल आधार

residentional photo
residentional photo

नाशिक ः भाजलेल्या व्यक्तीकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. अनेकदा अशा घटनांमुळे आलेले दिव्यांगत्व असो की विद्रूपपणामुळे व्यक्तीही इतरांजवळ जाणे टाळतात. लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, पण आता काळजी करण्याचे कारण नाही. जळिताच्या घटनांमधून येणारे दिव्यांगत्व आणि विद्रूपपणा या समस्यांशी दोन हात करण्याचे बळ "स्किन बॅंके'च्या माध्यमातून रुग्णांना मिळत आहे. गंभीर जळालेल्या व्यक्तीवर तातडीने त्वचा प्रत्यारोपण केले तर रुग्णाचा जीवही वाचण्याची शक्‍यता वाढते.

भारतात सर्वाधिक मृत्यू हे जळाल्यामुळे होतात, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. सध्या भारतात आठ स्किन बॅंकांद्वारे कामकाज चालत असून, वर्षभरात जवळपास 200 रुग्णांवर त्वचा प्रत्यारोपण केले जात आहे. मात्र, देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही मदत अतिशय कमी आहे. दर वर्षी देशात जवळपास दहा हजारांहून अधिक रुग्णांना त्वचादानाची गरज आहे. 

भारतातील आठवी स्क्रिन बॅंक

मे 2016 मध्ये रोटरी क्‍लब ऑफ नाशिक आणि वेदांत हॉस्पिटलतर्फे शहरातील एकमेव व भारतातील आठवी स्किन बॅंक आहे. राज्यात पाच स्किन बॅंका आहेत. या सर्व बॅंकांना नेदरलॅंड्‌स येथील युरो स्किन बॅंकेकडून तांत्रिक सहाय्य मिळते. नाशिकमधील डॉ. राजेंद्र नेहेते यांच्या वेदांत हॉस्पिटलमधील जागेत सुरू केलेल्या या बॅंकेचा "ना फायदा- ना तोटा' या तत्त्वावर काम सुरू आहे. गेल्या चार वर्षांत या बॅंकेच्या सहाय्याने 70 टक्‍क्‍यांहून अधिक जळालेल्या चार रुग्णांना जीवनदान मिळाले. आतापर्यंत 19 जणांनी त्वचा दान केली. 190 जणांनी त्वचा दान करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. मात्र, यात तरुणांचा सहभाग मोठा असल्याने प्रत्यक्ष दान हे कमी होत आहे. स्किन ट्रान्स्प्लांट हे सुलभ व झटपट करणे शक्‍य आहे. मात्र, तेवढ्या प्रमाणात स्किनच उपलब्ध नसल्याने या सुविधेचा फायदा घेणे कुणालाही शक्‍य होत नाही. जळालेल्या किंवा अपघातात त्वचा खराब झालेल्या व्यक्तींसाठी स्किन बॅंक वरदान ठरते. 

नक्की वाचा-सप्तश्रृंगी देवीच्या गाभाऱ्यात नो एन्ट्री

गंभीर जळालेल्या रुग्णांसाठी जीवरक्षक 

त्वचारोपण गंभीर जळालेल्या रुग्णांसाठी जीवरक्षक, तर 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी भाजलेल्या रुग्णांना पूर्ववत त्वचाप्राप्तीसाठी सहाय्यभूत ठरते. ज्या व्यक्तींची 30 टक्‍यांपेक्षा कमी प्रमाणात त्वचा जळालेली आहे, अशा व्यक्तींना स्वतःच्याच शरीरावरील दुसऱ्या भागोतील स्किन त्या ठिकाणी लावली जाते. कोणत्याही दुर्धर आजाराशिवाय ज्या व्यक्ती मृत झाल्या आहेत,

सहा तासात दान 

 त्वचा सहा तासांत या बॅंकेत दान करता येते. एड्‌स, हेपिटॅटिस बी आणि सी, गुप्तरोग, त्वचेचा कर्करोग, त्वचेचे आजार, रक्तदोष असलेल्या लोकांची त्वचा दानासाठी अपात्र ठरते. घेतलेली त्वचा बॅंकेत साठवून ठेवण्यासाठी "ग्लिसरॉल' या रासायनिक द्रव्यात जपून ठेवली जाते. त्यामुळे या स्किनचे आयुर्मान तीन वर्षांपर्यंत वाढण्यास मदत होते. नेत्रदान, देहदान याप्रमाणे त्वचादानासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. त्वचादानाची नोंदणी केली तर अनेकांना त्याचा लाभ होऊ शकतो. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन जनजागृती केली जात आहे. 

"मृत्यूनंतर 45 मिनिटांचा सहवास द्या' 

स्किन बॅंकेसाठी पूर्णपणे मृत व्यक्तीची त्वचा घेतली जाते. यासाठी केवळ 30 ते 45 मिनिटे लागतात. यासाठी 4-5 लोकांची टीम असल्याने ते लवकरात लवकर जाऊन मृताच्या पाठ, मांडी आणि पायाची त्वचा घेतात. त्वचेचा केवळ वरचा भाग घेतल्याने मृत शरीराला कोणताही रक्तस्त्राव त्यामुळे होत नाही किंवा विद्रूपता येत नाही. त्यामुळे "तुमच्या मृत्यूनंतर 45 मिनिटांचा सहवास आम्हाला द्या' असे आवाहन डॉ. नेहेते यांनी केले आहे. 

स्किन बॅंकेचे फायदे 
- रुग्णाची जीव वाचण्याची शक्‍यता वाढते. 
- इतर शस्त्रक्रियांसारखे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्‍शन होत नाही. 
- अवयव प्रत्यारोपणानंतर येणारा ऍन्टिबायोटिक्‍सचा खर्च वाचतो. 
- जळालेल्या भागावर त्रास होत नाही. 
- इतर अवयवांच्या प्रत्यारोपणानंतर इम्युनो सप्रेशन द्यावे लागते. त्यानंतर कर्करोगाची शक्‍यता वाढते. मात्र, त्वचा प्रत्यारोपणाला इम्युनो सप्रेशनची आवश्‍यकता नाही. 
- क्रॉस मॅच, एचएएल मॅच असण्याची गरज नाही. 


दान केलेली त्वचा प्रक्रियेसाठी मुंबईत ठेवली जाते. रुग्णाला जेव्हा गरज पडेल तेव्हा नाशिकमध्ये मागवून प्रत्यारोपण केले जाते. भविष्यात शहरातच प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यासाठी दान करणाऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. 
- डॉ. राजेंद्र नेहेते, प्लॅस्टिक, कॉस्मेटिक आणि मायक्रोव्हॅस्कूलर सर्जन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com