वय ८० वर्ष, पण तरुणांना लाजवेल असा जैनबाबांचा वृत्तपत्र वाटपात अजून ही जोश कायम !    

एल. बी. चौधरी
Thursday, 15 October 2020

पाच वर्षांचे असताना म्हणजे १९४५ मध्ये श्री. जैन यांनी वृत्तपत्र विक्री सुरू केली. दिवसाला एक आणा कमाई व्हायची. ऊन, थंडी, पावसाची तमा न बाळगता ७५ वर्षांपासून ते वृत्तपत्र विक्री करीत आहेत.

सोनगीर ः घरची गरिबीची स्थिती, त्यातच मी वर्षाचा असताना, आई व वडिलांमधील मतभेदामुळे आईने घर सोडले. पुढे करायचे काय? उदरनिर्वाह कसा करायचा? भविष्याच्या अंधूक व कठीण मार्गावर चाचपडत असताना मी आणि आईने बऱ्हाणपूरचा (मध्य प्रदेश) कायमचा निरोप घेतला आणि मामांकडे सोनगीरला (ता. धुळे) आलो. नंतर सुरू झाला जगण्याचा संघर्ष. ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता रमेशचंद्र अमृतलाल जैन (वय ८०) सांगत होते. ते पंचक्रोशीत ‘जैन बाबा’ म्हणून परिचित असून, या व्यवसायाद्वारे ते समाजपरिवर्तनात योगदान देत आहेत. 

आवश्य वाचा- पाया खोदता खोदता अचानक मडके दिसले; आणि मडक्यात निघाली राणी व्हिक्टोरियाची मुद्रा !
 

माजी ‍राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्ह्यातील ज्येष्ठ श्री. जैन यांच्या कार्याला उजाळा मिळत आहे. वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय आज बऱ्यापैकी कमाई देणारा असला तरी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर अनेक वर्षे वृत्तपत्र विक्री सेवा म्हणूनच केली जात असे. श्री. जैन बऱ्हाणपूर सोडून सोनगीरला वृत्तपत्र विक्रेते असलेले मामा दोधुसा केशालाल जैन यांच्याकडे आले. त्यांच्या आईने दळणे दळून त्यांचे व बहिणीचे पोषण केले. हातात पैसा नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी काम शोधणे भाग होते. डॉ. तथा स्वातंत्र्यसैनिक (कै.) गे. म. हुंबड यांनी थोडी आर्थिक मदत केली. 

वयाच्या पाचव्या वर्षापासून काम 
पाच वर्षांचे असताना म्हणजे १९४५ मध्ये श्री. जैन यांनी वृत्तपत्र विक्री सुरू केली. दिवसाला एक आणा कमाई व्हायची. ऊन, थंडी, पावसाची तमा न बाळगता ७५ वर्षांपासून ते वृत्तपत्र विक्री करीत आहेत. पूर्वी मुंबईची वर्तमानपत्रे रेल्वेने जळगाव व तेथून नरडाण्याला पहाटे चार-साडेचारला येत. १९७२ ते १९९२ अशी २० वर्षे पहाटे तीनला उठून तयारी करून ते सायकलने १२ किलोमीटर रेल्वेस्थानकावर जायचे. पूर्वी पोलिसांच्या गणवेशाप्रमाणे हाफ पॅन्ट, गुडघ्यापर्यंत मोजे, गोल टोपी, अशी वेशभूषा असायची. नरडाण्याहून परत येताना श्री. जैन पहाटेच काही खेडेगावांत वर्तमानपत्रे वाटप करीत साडेपाचच्या सुमारास सोनगीरला पोचत. 
   

पैशांपेक्षा उदंड प्रेम मिळाले 
स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्र विकतात, म्हणून अनेकदा श्री. जैन यांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली जाई. पाऊणशे वर्षे जनतेला जगातल्या दैनंदिन घडामोडींची माहिती वृत्तपत्राद्वारे पोचवून ते जागल्याची भूमिका निष्ठेने पार पाडत आहेत. विविध मीडियावर रोज बातम्यांचा भडिमार सुरू असतानाही वृत्तपत्रांमधील बातम्याच आजही विश्वासार्ह मानल्या जातात व त्यामुळे खप कायम आहे, असे श्री. जैन सांगतात. ते म्हणाले, ‘‘वृत्तपत्र विक्रीतून पैसा भलेच जास्त कमावला नसेल, तरी लोकांचे उदंड प्रेम मिळाले. अनेक ठिकाणी वृत्तपत्रासाठी आजही लोक वाट पाहतात. ते हातात पडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच माझी मिळकत. लोकांपर्यंत माहितीचा खजिना पोचविण्याचे काम मी करत आलो यातच माझे समाधान आहे.’’ 

आवर्जून वाचा- साहेबातल्या माणुसकीचे दर्शन, दिव्यांग व्यक्तीसह कर्मचारी झाले अंचबीत
 

८० वर्षांचा तरुणच... 
वय वर्षे ८०, कंटाळा नसलेले ज्येष्ठ रमेशचंद्र जैन आजही तरुणाला लाजवतील असे काम करतात. पहाटे तीनला उठून तयारीनंतर ते बसस्थानकावर जातात. वर्तमानपत्रे घेतात. ती नीट लावतात. पायी अथवा सायकलवरून वृत्तपत्रे वाटपाचा त्यांचा नित्यक्रम आहे. यात त्यांचे किमान १५ किलोमीटर फिरणे होते. त्यामुळे स्वास्थ्य टिकून असून, त्यांना आजारपण माहिती नाही. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songir Eighty year olds still have the same passion for newspaper distribution