ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात नाही ‘गोडवा’ 

फुंदीलाल माळी
Thursday, 26 November 2020

थंडी, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता काम करणारे हात मात्र दुर्लक्षितच राहात असल्याची भावना आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांचेही जीवन सुसह्य होण्यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे.

तळोदा : ‘दुनिया दोन हातांची रे बाबा दुनिया दोन हातांची, दोन हातांमधल्या या वीतभर भगवन मंदिराची, दुनिया दोन हातांची...’ शाहीर अमर शेख यांनी लिहिलेल्या या गीताचे बोल दोन हातांच्या भरवशावर काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकण्यासाठी तयार झालेल्या ऊसतोडणी मजुरांच्या लगबगीच्या चित्राने व त्यांनी टाकलेल्या तांड्यांनी खरे होताना दिसत आहेत. गरजेपुरते संसाराचे साहित्य व हातात कोयता घेऊन ऊस तोडणीसाठी गावोगावी मजुरांची पाले टाकली जात असून, ‘दुनिया दोन हातांची...’ असे म्हणत ऊसतोड मजुरांची भटकंती सुरू झाली आहे. 

आवश्य वाचा- तक्रारी करून थकली; बस्स, आत्महत्येची परवानगी द्या ! 

जिल्ह्यातील साखर कारखाने व खांडसरी उद्योग सुरू झाले असल्याने ऊसतोड मजूर गावोगावी दाखल होत आहेत. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. दर वर्षी लाखो टन उसाचे गाळप जिल्ह्यात होते. पुरुषोत्तमनगर, समशेरपूर, डोकारे येथे साखर कारखाने, तर तळोदा, निंभोरा याठिकाणी खांडसरी उद्योग आहे. अन्य जिल्हे, तसेच मध्य प्रदेशातील खेतिया व गुजरातमधील बारडोली, मांडवी या ठिकाणी असलेल्या कारखाने व खांडसरी उद्योगासाठी ऊसतोडणी करण्यासाठी मजूर येत आहेत. औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांतून तसेच, धडगाव तालुक्यातील व स्थानिक मजूरदेखील ऊस तोडणीसाठी शेतशिवारात दाखल झाले आहेत. 
संसाराचा गाडा चालविण्यासाठी या कुटुंबांना दोन हातांची मदत घेऊन कामासाठी सज्ज व्हावे लागते. कामासाठी पहाटे तयार होऊन हे मजूर शेतशिवारात पोचत आहेत. थंडी, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता काम करणारे हात मात्र दुर्लक्षितच राहात असल्याची भावना आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांचेही जीवन सुसह्य होण्यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे. 

आठ वर्षांपासून ऊसतोडणीचे काम करीत आहे. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही ऊसतोड करतो. पोटाची खळगी भरण्यासाठी हे काम करतो. कुटुंबात दहा जण आहेत. त्यांची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. मुलांच्या शिक्षणासाठी कर्जही झाले आहे. ते फेडण्यासाठी काम करावे लागते. हातपाय चालतात तोपर्यंत मेहनत करावी, या भावनेने काम करीत राहणार आहे. 
-केशव वळवी, मुंदलवड, ता. धडगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news talaoda sugarcane workers continue to roam for work