जैवविविधतेने नटलेल्या तळोद्यात पाच वर्षांनी उमलले पांढरे कमळ   

फुंदीलाल माळी
Saturday, 19 September 2020

तळोदा ः तळोदा तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी जमा झाले आहे. त्यात हातोडा रस्त्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेवर साचलेल्या पाण्यात कमळ फुलले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांनी हातोडा रस्त्यावर फुललेले कमळ तळोदा वासियांना पाहायला मिळत आहेत. ही कमळाची फुले पांढऱ्या रंगाची असल्याने त्या फुलांना पाहण्यासाठी पर्यावरणप्रेमी रस्त्यावर निसर्गाचा सान्निध्यात भटकंती करीत आहेत.

आवश्य वाचा ः जळगावचे ६३ वर्षीय अशोकराव अठराशे किलोमीटर अनवाणी पायी निघाले मोदींच्या भेटीला !

तळोदा तालुका अनेक फुलझाडे व वनस्पतींचे माहेरघर आहे. अनेक दुर्मिळ लता वेली ,फुलझाडे व वनस्पती तालुक्यात आहेत. त्यात कमळाची उमलणारी फुले देखील तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. शहरातील हातोडा रस्ता व अक्कलकुवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाणथळ जागेत कमळाची फुले वर्षानुवर्षे येत होती. मात्र मागील चार-पाच वर्षांपासून कमळाची फुले दिसेनाशी झाली होती. त्यात ही वनस्पती अनेक वर्षे सुप्तावस्थेत राहू शकत असल्याने समाधानकारक पाऊस झाल्यास ती उगवते व फुले उमललेल्या अवस्थेत दिसू लागतात.

कमळाच्या जगात ३६ जाती

त्यामुळे यंदा समाधानकारक पावसामुळे हातोडा रस्त्यावर रस्त्याचा कडेला साचलेल्या पाण्यात कमळाची फुले उमलली आहेत. जणूकाही ते आपल्या अस्तित्वाचा संदेश तळोदावासीयांना देत आहेत . ही वनस्पती गोड व उथळ पाण्यात वाढते. तिच्या जगात सुमारे 36 जाती आढळतात. त्यात पांढऱ्या रंगाचे कमळ आपले लक्ष वेधून घेते. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळचा यशवंत तलाव , सीताखाई कडे जाणारा रस्ता व डोंगरगावच्या तलावात कमळे आढळून येतात.

आवर्जून वाचा ः  खडसे शिवसेनेत येण्याचा विषय गुलाबराव बघून घेतील ! 
 

हिंदू, बौध्द धर्मात कमळाला महत्व

कमळाकडे विविध किटके देखील आकर्षित होत असल्याने कमळ वनस्पती असलेल्या भागात जैवविविधता टिकण्यास देखील मदत होते. तर हिंदू धर्मात व बौद्ध धर्मातही कमळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यात तळोदा शहराच्या आजूबाजूला असलेल्या पाणथळ जागेवर कमळाची फुले उमलली असल्याने वनस्पती प्रेमी व पर्यावरण प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

अतिक्रमण, कचऱयामुळे कमळाचे फुले दिसेनाशी

वाढते अतिक्रमण व त्यात रस्त्याचा कडेला कचरा टाकण्याचा सवयी यामुळे हातोडा रस्त्यावर कमळ उगवणाऱ्या जागा कमी होत आहेत. येथे पूर्वीप्रमाणे सहज पाण्यात उगवणारी वनस्पती म्हणून कमळ राहिली नाही. गुलाबी कमळे देखील येथे पूर्वी मोठ्या प्रमाणावर उगवत होती. आता मात्र ती दिसेनाशी झाली आहेत. त्यात पांढरे कमळ या भागात उगवल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

तळोद्यातील हातोडा व अक्कलकुवा रस्त्यावर पूर्वी कमळ ही वनस्पती सहज दृष्टीस पडत असे. मात्र मागील पाच सहा वर्षांपासून ती दिसेनासी झाली होती. यंदा मात्र समाधानकारक पावसाने हातोडा रस्त्यावर तिचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक या वनस्पतीचे तळोद्यात संवर्धन झाले पाहिजे. त्यात पांढरे कमळ दुर्मिळ असल्याने ही जैवविविधता टिकली पाहिजे.

-प्रा. अशोक वाघ, पर्यावरणप्रेमी तळोदा.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda after five years, white lotus flowers bloomed in taloda village, crowds to see the environment lovers